लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो. सर्वच जण त्यासाठी अत्यंत खास तयारी करतात. लग्नानंतर हनीमूनला कुठे जायचं याच दंखील प्लॅनिंग आधीचं ठरलेलं असतं. त्यासाठी बुकिंग सुद्धा करण्यात आलेली असते. पण तुम्हाला जर कोणी एखादं कपल हे दुसऱ्या दिवशी हनीमूनऐवजी कब्रस्तानात पोहोचल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. आपल्या आनंदाच्या सोहळ्यात एका जोडप्य़ाने सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 15 जणांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रिद्जीवन ओसमान नावाच्या तरुणाचं नूर अफिफा हबीब नावाच्या तरुणीसोबत 13 डिसेंबर रोजी लग्न झालं होतं. या पती पत्नीने लग्नानंतर हनीमूनला जाण्य़ाऐवजी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. हनीमूनऐवजी कब्रस्तानाच लग्नानंतरचे काही दिवस घालवण्याचा निर्णय घेतल्याने लोकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मोहम्मद हा एका सामाजिक संस्थेत काम करत होता आणि गेल्या काही महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पार पाडत होता.
कोरोना वॉरियरचं काम करण्याचा निर्णय
कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले आहेत, त्यांना कब्रस्तानात घेऊन जाणं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणं हे काम तो करायचा. लग्नाच्या दिवशीदेखील त्याला काहीजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समजलं. एकीकडे त्याचं लग्न झालं होतं आणि दुसरीकडे ही माहिती मिळाल्यामुळे त्याला अंत्यसंस्कारासाठी जाण्याची इच्छा होती. त्याने याबाबत आपल्या पत्नीशी चर्चा केली आणि दोघांनीही हनीमून पोस्टपोन करून कोरोना वॉरियरचं काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्न झाल्यानंतर जोडप्याने 15 जणांवर केले अंत्यसंस्कार
लग्न झाल्यानंतर या जोडप्याने 15 जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. या जोडप्यानं आपलं वैयक्तिक आयुष्य आणि त्यातील आनंद या गोष्टी पुढे ढकलत सर्वात आधी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतला. आपल्या कृतीतून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. मोहम्मद यांच्यासोबत अनेक जण या टीममध्ये काम करत आहेत. कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी ते धडपडत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.