ओ शेठ! तुम्ही नादच केलाय थेट गाणं सध्या सर्वत्र गाजतंय. यूट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत अडीच कोटींच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याचा मेकिंग व्हिडीओदेखील गाजलाय. तो आतापर्यंत जवलपास दोन कोटी लोकांनी पाहिलाय. सोशल मीडियावरदेखील या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर याच धर्तीवर त्याच्या सरांसाठी गायलेलं ओ सर गाणं व्हायरल झालं आहे.
संपूर्ण देश गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. गेल्या मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन लागला. तेव्हापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांची गाठभेट झालेली नाही. ऑनलाईन वर्ग भरत आहेत. मात्र व्हर्च्युअल भेटीत प्रत्यक्ष भेटीची मजा काही येत नाही. त्यामुळेच एका विद्यार्थ्यानं सरांसाठी विशेष गाणं तयार केलंय. ओ शेठच्या धर्तीवर चिमुरड्यानं गायलेल्या ओ सर गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे.
ओ सर! नाही पडणार तुमचा विसर, असं म्हणत विद्यार्थ्यानं शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ऑनलाईन भरणारी शाळा, मात्र त्यात ऑफलाईन शाळेसारखी नसलेली मजा, हाती आलेला मोबाईल यावर विद्यार्थ्यानं गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. 'कोरोनानं शाळा बंद झाली. आठवण तुमची लय हो आली. ओ सर नाही पडणार तुमचा विसर. ओ सर आहे आमच्यावर तुमचा असर,' अशा शब्दांत विद्यार्थ्यानं शिक्षकांबद्दलच्या त्याच्या भावना गाण्यातून व्यक्त केल्या आहेत.