गाझियाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध मतदारसंघात विकसित भारत संकल्प यात्रा निघाली आहे. या यात्रेतून सरकारच्या योजना, त्याचे लाभ याचा प्रसार लोकांपर्यंत केला जात आहे. परंतु गाझियाबादच्या मोदीनगर इथं विकसित भारत संकल्प यात्रेत चक्क बॉलिवूडच्या जुन्या गाण्यांवर ठुमके लागल्याचे दिसून आले. या यात्रेतील महिलेचा डान्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई या गाण्यावर महिला थिरकताना दिसून येते.
गाझियाबादच्या शकुरपूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात खासदार, आमदारांसह अनेक बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी भाजपा नेत्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारद्वारे लोकांच्या योजनांची माहिती दिली जात होती. मात्र आता या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओत महिला डान्सर स्टेजवर नाचताना दिसते. परंतु ज्यावेळी हा डान्स सुरू होता तेव्हा कुठलाही भाजपा नेते अथवा सरकारी अधिकारी मंचावर दिसत नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर बोलणे टाळले आहे.
दरम्यान, याप्रकरणी भोजपूरचे बीडीओ पीयूष राय सांगितलं की, या कार्यक्रमाला खासदार आणि आमदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दिमाखदार पद्धतीने करण्यात आले. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर स्थानिक पातळीवर कोणीतरी हे केले असावे.