Naveen Patnaik Viral Video: नुकत्याच पार पडलेल्या ओडिशा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. १४७ जागांपैकी भाजपाने ७८ जागा जिंकल्या. तर नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल पक्षाने ५१ जागा जिंकल्या. काँग्रेसच्या पदरी केवळ १४ जागा आल्या. या निकालानंतर ओडिशा विधानसभेत एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. नवीन आमदार शपथ घेत असताना माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक हे भाजपच्या एका आमदारासमोर आले आणि अनोख्या ढंगात नव्या आमदाराशी ओळख करून घेतली.
ओडिशा विधानसभेत भाजपाने बहुमत मिळवले. या विधानसभा निवडणुकीत ओडिशाचे पाच वेळा माजी मुख्यमंत्री असलेले नवीन पटनायक यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. पटनायक हिंजिली मतदारसंघातून ४,६०० मतांनी विजयी झाले. पण कांटांबाजी मतदारसंघातून ४८ वर्षीय भाजप नेते लक्ष्मण बाग यांनी पटनायक यांचा १६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. लक्ष्मण बाग जेव्हा ओडिशा विधासभेत हजर होते. त्यावेळी नवीन पटनायक सभागृहात आले आणि म्हणाले, 'अच्छा, तर ते तुम्हीच आहात, ज्यांनी माझा पराभव केला.'
नेमके काय घडले? पाहा व्हिडीओ
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. पटनायक सभागृहात जात असताना एका सदस्याने उभे राहून त्यांना नमस्कार केला. नवीन पटनायक यांनी थांबून त्यांच्याकडे वळून पाहिले. आमदारांनी आपला संक्षिप्त परिचय करून देत नाव सांगितले. हे ऐकून माजी मुख्यमंत्री हसले आणि म्हणाले की, तुम्हीच माझा पराभव केला आहे ना... पटनायक हे म्हणत असताना मुख्यमंत्री आणि शेजारी बसलेले इतर नेतेही आदराने उभे राहिले आणि खळखळून हसले.
दरम्यान, भाजपा नेत्यांनीही नवीन पटनायक यांना मान दिला आणि उठून अभिवादन केले. त्यानंतर सर्वांचे अभिवादन स्वीकारून पटनायक पुढे गेले.