अनेकांना घरामध्ये मांजरीसारखे पाळीव प्राणी पाळण्याचा शौक असतो. मात्र, एका जोडप्यासोबत झालेला प्रकार धक्कादायक होता. त्यांनी जाहिरात पाहून पाच लाख रुपयांना असलेले मांजरीचे पिल्लू मागविले मात्र, घरी जे आले ते पाहून त्यांची आकडी बसायची वेळ आली.
फ्रान्सच्या नॉर्मंडीतील एका जोडप्याला मांजराची एक विशेष प्रजाती सवाना (Savannah Cat) हवी होती. या संबंधीत एक जाहिरातही त्यांनी वाचली आणि थेट ऑर्डरच देऊन टाकली. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याने या मांजरीसाठी पाच लाख रुपये वेगळे काढून ठेवले होते तसेच ऑनलाईन जाहिरात पाहूनच मांजरीचे पिल्लू खरेदी केले होते. त्यांना नंतर समजले की ते मांजर नसून वाघाचा बछडा होता. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
2018 मध्ये हा धक्कादायक खुलासा झाला होता. या छोट्या वाघाची ओळख हळूहळू पटत गेली. पोलिसांनी तपास केला असता ते मांजरीचे पिल्लू नसून ‘सुमात्रा टायगर’ आहे. हे वाघाचे रुप समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जोडप्याने अखेर बछड्याला फ्रान्सच्या बायोडायवर्सिटी टीमच्या हवाली केले. आता या बछड्याचे तिथेच संगोपन करण्यात येत आहे. सुमात्रा टायगर हे इंडोनेशियाचे आहेत. हे दुर्मिळ प्रजातीमध्ये मोडतात. जगात सध्या केवळ ४०० सुमात्रा वाघच जिवंत आहेत.