पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. नुकताच नासाने चाळीस वर्षांत पृथ्वी कशी निळ्याची लाल होत चालली याचा फोटो जारी केला आहे. यामुळे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नैसर्गिक आपत्तींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज ऑस्ट्रेलियात, उद्या भारतीय उपखंडात आणि परवा अमेरिकेच्या कुठल्यातरी टोकाला, अशा घटना घडत आहेत.
युरोपचा एक भाग सुकत चालला आहे. पश्चिमी युरोपमध्ये भीषण आगीची बातमी येत आहे. तेवढ्यात अमेरिकेतून एक खतरनाक व्हिडीओ येत आहे. वेडिंग सेरेमनी सुरु असताना अजस्त्र लाटांनी त्या क्षणाची पुरती वाट लावल्याचे एका व्हिडीओत दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत या अजस्त्र लाटांनी दुमजली घरावरून थेट मागच्या अंगणात उडी घेतल्याचे दिसत आहे.
अमेरिकेतील हवाई बेटे आणि कोना सर्फ येतील हे व्हिडीओ सोशल मिडीयावर कमालीचे व्हायरल होत आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये समुद्रालगतच्या लॉनमध्ये हवाई बीचवर वेडिंग रिसेस्पशन सुरु होते. तेव्हा अचानक मोठी लाट उसळताना दिसली आणि सर्व पाहुण्यांची धावपळ उडाली. तोवर लाटेने येऊन सारे पाडून टाकले होते.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक दुमजली इमारत आहे. त्यावर लाट आदळताना दिसत आहे. ही लाट एवढी उंच होती की या दुमजली घराच्या छतावरून पलिकडे या लाटेचे पाणी पडताना दिसत आहे. या लाटा एवढ्या मोठ्या अशावेळी उसळल्या होत्या, जेव्हा हवामानात काहीच बदल झालेले नव्हते. ना जोरदार वारे वाहत होते. तज्ज्ञांनी या प्रकारांना भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटांचे संकेत म्हटले आहे.