तुम्ही जंगलात शहामृगाला पाहिलं असेल पण कधी शहरात गल्लीबोळात शहामृगाला फिरताना पाहिलं आहे का? सध्या शहरीकरणामुळे काँक्रिटची जंगल मोठी झाली आहेत आणि खरी जंगल लहान. मग हे प्राणी शहरात येणारच कारण आपण त्यांचा निवाराच हिसकावून घेतलाय. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. VeryOrdinaryDoctor यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जे काही आहे ते पाहुन तुम्हाला धक्काच बसेल...
या व्हिडिओत एक शहामृग महामार्गाच्या मध्यभागी जोरात धावत आहे. ही घटना लाहोरमधील कॅनाल रोडवर घडलीय. तुम्ही म्हणाल आता हा शहामृग रस्त्यावर का पळतोय? तर याचे उत्तर कोणालाच माहित नाही. पण हा पाळीव शहामृग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरुन जाणारे वाहनचालक, प्रवासी आश्चर्यचकित होऊन शहामृगाला पाहत आहेत. त्यांनी हा नजारा कॅमेऱ्यात कैदही केला आहे.
पाकिस्तानमधील रस्त्यांवरून धावणाऱ्या शहामृगाचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत. या शहामृगाला जणू ऑफिसला पोहोचण्याची घाईच झालीय की काय, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर दुसऱ्याने त्याला उद्देशून, उस्ताद, कहां जा रहे हो? असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी अशा प्रकारे शहामृग रस्त्यावर आल्याबद्दल चिंतादेखील व्यक्त केली आहे.