तसे तर सोशल मीडियात कितीतरी फोटो व्हायरल होत असतात. पण काही फोटोंची बातच वेगळी असते. आता एका ९व्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या पेंटिंगचा एक फोटो व्हायरल झालाय. अनुजाथ सिंधु विनायल असं त्याचं नाव आहे. जेव्हा त्याने ही पेंटिंग काढली तेव्हा त्याने याचा विचारही केला नव्हता की, त्याची ही पेंटींग 2020-21 Gender Budget Document च्या कव्हर पेजसाठी निवडली जाईल. आता केवळ त्याच्या आईसाठी काढलेली त्याची ही पेंटिंग सगळा देश बघेल.
केरळच्या त्रिसूरमध्ये राहणारा अनुजाथला त्याची पेंटिंग 2020-21 Gender Budget Document च्या कव्हर पेजसाठी निवडली गेल्याचं केरळचे अर्थमंत्री थॉमस आयजॅक यांनी सांगितले.
काय आहे पेंटिंगची खासियत?
या पेंटिंगमध्ये त्याने एक गाव काढलंय. ज्यात सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. यात त्याने त्याची आई आणि आजूबाजूच्या महिलाही कशाप्रकारे काम करत आहेत हे दाखवलं. म्हणून त्याने या पेंटिंगला My Mother and other mothers in the neighborhood असं नाव दिलं.
अनुजाथने काही वर्षांपूर्वी ही पेंटिंग त्याच्या आईसाठी काढली होती. ही पेंटिंग त्याच्या वडिलांनी दिल्लीतील शंकर कला अकादमी आणि पुस्तक प्रकाशन द्वारे आजोजित आंतरराष्ट्रीय ड्रॉइंग स्पर्धेत पाठवली होती. यातच या पेंटिंगला पहिला क्रमांक मिळाला.
अनुजाथ हा गेल्या चार वर्षांपासून पेंटिंग करतो. त्याने आईसाठी ही पेंटींग तयार केली होती. त्याच्या आईला हृदयरोग होता. त्यामुळे त्यांचं निधन झालं होतं. आईच्या आठवणीत त्याने ही पेंटिंग तयार केली होती. नंतर अनुजाथने अनेक पेंटिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तसेच त्याला अनेक पारितोषिके सुद्धा मिळाली आहेत.