Pakistan Airplane Pilot cleaning Windshield: पाकिस्तानबद्दल रोज आश्चर्यकारक बातम्या येत असतात. सोशल मीडियावर अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला. सेरेनाएअर कंपनीचा पायलट टेकऑफ करण्यापूर्वी त्याच्या एअरबस A330-200ची विंडशील्ड साफ करताना दिसला. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. फुटेजमध्ये पायलट कॉकपिटच्या खिडकीतून बाहेर निघून विमानाची विंडशील्ड साफ करताना दिसतो. एखाद्या ट्रक ड्रायव्हरप्रमाणे तो हा प्रकार करतो. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओवर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि एअरलाइनच्या सुरक्षा प्रोटोकॉलबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानहून जेद्दाह, सौदी अरेबियाला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानादरम्यान ही घटना घडली. वैमानिकांनी वैयक्तिकरित्या अशा कृती करणे योग्य नसते. त्यामुळे व्हिडिओने याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणावर काही सोशल मीडिया युजर्सनी पायलटचे कौतुक केले आहे, तर काहींनी या प्रकाराची टिंगल केली आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'हे खरंच चांगलं आहे. लोकांना प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता का दिसते? काच साफ करणं महत्त्वाचं आहे आणि पायलटने असं केलं तर त्यात लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, हा प्रकार सामान्य आहे. जर पायलटला हे करायचे असेल तर ते ठीक आहे. ते अशा गोष्टींसाठी मदत मागू शकतात पण जर एखाद्याला ते स्वतः करायचे असेल तर ते ठीक आहे.
काहींनी मात्र यावरून पायलट आणि एअरलाइनची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने लिहिले की, मी या पायलटला ओळखतो. तो विंडशील्ड साफ करतो आणि प्रवाशांना टिप्स विचारतो. त्याला ३० हजार फुटांवर असे करताना बघायला आवडेल. काहींनी या पायलटला ट्रक ड्रायव्हरसारखी कृती करणारा असे म्हणूनही हिणवले आहे.
विमानाच्या विंडशिल्डची सफाई कोण करतं?
बऱ्याच एअरलाईन्समध्ये, विंडशील्ड साफ करणे यासारखी कामे सामान्यत: ग्राउंड स्टाफ किंवा देखभाल कर्मचाऱ्यांकडून हाताळली जातात. पायलट प्रामुख्याने उड्डाणपूर्व तपासणी, हवामानाच्या स्थितीचे पुनरावलोकन करणे आणि टेकऑफपूर्वी सर्व यंत्रणा योग्यरित्या कार्य करत असल्याची खात्री करतात. पण एखाद्या पायलटला आवश्यक वाटल्यास तो हे कार्य करूच शकतो. मात्र सहसा पायलटने विंडशील्ड साफ करणे हा प्रकार सामान्य नाही.