पाकिस्तानात टोमॅटोचा भाव ३०० रूपये किलो झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील लोक टोमॅटोला सोन्यासारखंच महत्व देऊ लागले आहेत. सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका नवरीने टोमॅटोचे दागिने घातले आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना पत्रकार नायला यांनी लिहिले आहे की, 'टोमॅटोचे दागिने...तुम्हाला असं वाटतं का की, तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही पाहिलंय...'. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर मजेदार कमेंटही बघायला मिळत आहेत.
या व्हिडीओमधे दिसणारी नवरी म्हणाली की, तिच्या देशात टोमॅटो आणि पाइन नट्सची किंमत सोन्यासारखी झाली आहे. हेच कारण आहे की, तिने सोन्याऐवजी टोमॅटोचे दागिने घातले आहेत. ती म्हणाली की, तिच्या भावाने तिला पाइन नट्स गिफ्ट दिले आहेत. तर तिच्या आई-वडिलांनी तीन सूटकेस भरून टोमॅटो दिले आहेत.