महागड्या रेस्टॉरंटची बिलं अनेकदा लोकांना आश्चर्यचकित करतात. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. इंटरनेटवरही ईशान शर्मा नावाच्या युजरने फाइव्ह-स्टार रेस्टॉरंटचं बिल शेअर केलं आहे. यामध्ये डिशेसची किंमत पाहून लोक आता कमेंट सेक्शनमध्ये जोरदार वाद घालताना दिसत आहेत. बिलामध्ये पनीरची किंमत २९०० रुपये लिहिली आहे. तर १ रोटी ३७५ रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटने 'कोणतंही सेवा शुल्क' आकारलेलं नाही. तरीही एकूण बिल बघून सर्वांनाच धक्का बसला आहे.
ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये ५ डिश खाण्यासाठी ऑर्डर केल्या होत्या. ज्यामध्ये शाही पनीर खुरचन २९०० रुपये, शाही दाल बुखारी १२०० रुपये, ३ पुदीना पराठे १२७५ रुपये, १ खस्ता रोटी ३७५ रुपये आणि शाही पनीर मखनी २९०० रुपये होती. या सर्व पदार्थांचं एकूण बिल १० हजार ३० रुपये आलं. तसेच बिलावर 'आम्ही कोणतेही सेवा शुल्क आकारत नाही' असं लिहिलं होतं.
हे बिल पाहून इंटरनेट युजर्समध्ये चर्चेला उधाण आलं आहे. एका युजरने पोस्टवर कमेंट करताना लिहिलं की, जेवढ्या पैशाचा पुदीना पराठा आहे. तेवढ्या पैशात माझा डिनर होईल. तर दुसऱ्याने, भाऊ... जर तुम्हाला बिल पोस्ट करायचं असेल तर तुम्ही एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये का जाता? असा प्रश्न विचारला. अशाप्रकारे अनेक युजर्सनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
@Ishansharma7390 या युजरने रेस्टॉरंटचे २ फोटो पोस्ट केले. त्याच्या या पोस्टला १० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि साडेसात हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये ७०० हून अधिक रिप्लाय आले आहेत. याआधी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.