नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाबा का ढाबा हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे. लॉकडाऊनमध्ये बाबा का ढाबा चालवणाऱ्या आजोबांचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिल्लीतील 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगलंच उचलून धरलं. त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच दिसला. एकेकाळी बाबाच्या ढाब्यावर कोणी फिरकतही नव्हतं. मात्र अचानक सोशल मीडियाच्या कमालीमुळे या आजोबांच्या ढाब्यावर खवय्यांची गर्दी झाली. आजोबांच्या व्हिडीओनंतर आता कष्ट करणाऱ्या आजींचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कोरोनाच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने अनेकांना कसं जगायचं हा प्रश्न पडला आहे. दिल्लीतील बाबा का ढाबाच्या आजोबांप्रमाणेच एक आजी देखील ढाबा चालवतात. पार्वती अम्मा असं त्यांचं नाव आहे. घर चालवण्यासाठी पार्वती अम्मा केरळमध्ये एक छोटा ढाबा चालवतात. मात्र कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे खूपच कमी ग्राहक हे येत आहेत. ढाब्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे घर कसं चालवायचं?, कसं जगायचं? असा प्रश्न आजींना पडला आहे.
केरळमध्ये पार्वती अम्मांचा ढाबा, लॉकडाऊन अत्यल्प प्रतिसाद
एका पत्रकाराने केरळमधील पार्वती अम्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती अम्मा केरळमधील करींबा येथे ढाबा चालवतात. हा ढाबा चालवून त्या कुटुंबीयांचं पोट भरतात. मात्र कोरोनानंतर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामध्ये अम्माचा ढाबाही बंद झाला. आता तर हाताला काम नसल्यामुळे संकट ओढवलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी आजींच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
आजोबांप्रमाणेच आजींना देखील चांगला प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा
अभिनेत्री रिचा चड्डाने देखील पार्वती अम्मांचा हा व्हिडीओ शेअर केला आसून लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीतील बाबा का ढाबा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता केरळमधील नागरिक अम्मांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आजोबांप्रमाणेच आजींना देखील चांगला प्रतिसाद मिळावा अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बाबा का ढाबा या व्हिडीओनंतर 80 वर्षीय जोडप्याला मदत करण्यासाठी लोक ढाब्यावर गर्दी करत आहेत. जे लोक ढाब्यावर जाऊ शकत नव्हते त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून या वृद्धा दाम्पत्याला मदतीचा हात दिला आहे.
आजोबांच्या मदतीसाठी अनेकांचा पुढाकार
दिल्लीतील मालविया नगरमध्ये 80 वर्षीय आजोबांनी 'बाबा का ढाबा' सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर हे जोडपं ढाबा चालवत आहे. एका यूट्यूबरने हा व्हिडीओ रेकॉर्ड करू शेअर केला होता. व्हिडीओमध्ये आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं होतं. लॉकडाऊनमध्ये ढाब्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. अवघ्या काही तासांत हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आता अनेकांनी आजोबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.