तशा सोशल मीडियातछत्रपती शिवाजी महाराजांच्या सतत काहीना काही गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक व्हायरल झालेली गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे. लोक ट्विटरवर गुगल मॅपचा एका व्हिडीओ शेअर करत आहेत. यात ते एक लोकेशन शेअर करत आहेत. गुगल मॅप आपलं काम करतो आणि शिवाजी महाराजांचं एक सुंदर चित्र दिसू लागतं.
जर तुम्हाला वाटत असेल की, हे फेक आहे, तर तुम्ही चुकताय. ही कलाकृती मंगेश निपाणीकर या व्यक्तीने तयार केली आहे आणि ही देशातील पहिली ग्रास पेंटींग आहे. ही पेंटींग लोक सोशल मीडियात मॅपच्या माध्यमातून बघत आहेत.
लातूरमधील निलंगा गावात ही पेंटींग तयार करण्यात आली आहे. शेतात गवत उगवून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. हे सगळं शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी करण्यात आलंय.
मंगेश निपाणीकरने ६ एकर शेतात गवत उगवलं. त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा आराखडा तयार करून त्याला गवत उगवलं. आणि काही दिवसात शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा समोर आली. ही कलाकृती बघून सगळेजण हैराण झाले आहेत. गुगल मॅपवर ज्यांनी हे पाहिलं त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. यात थ्रीडी इफेक्ट आणण्यासाठी यात ग्राफ्टिंगही करण्यात आली आहे. ७ दिवसात ही प्रतिमा अशी दिसू लागली आहे.