हुंड्याबाबत अनेक कायदे करण्यात आले, अनेक मोहिमा चालवल्या गेल्या आणि आजही त्याला विरोध होताना दिसतो. मात्र आजही ही प्रथा समाजात सुरू आहे. हुंड्याच्या नावाखाली मौल्यवान भेटवस्तू दिल्या जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये वधूचं कुटुंब नवरदेवाला भरपूर मौल्यवान वस्तू देतात. एक व्यक्ती दिल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी वाचताना दिसत आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
या वस्तूमध्ये एक मर्सिडीज ई-क्लास कार, एक टोयोटा फॉर्च्यूनर, 7 किलो चांदी आणि 1.25 किलोपेक्षा जास्त सोन्याचा समावेश आहे. यासोबतच नंतर एक कोटी रुपये रोखही देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या व्हायरल व्हिडीओवर लोक सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
आजच्या आधुनिक काळातही असे व्यवहार पाहून लोक समाजाविषयी चिंता व्यक्त करत आहेत. या कार्यक्रमाचा व्हिडीओ विनीत भाटी नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अनेक युजर्सनी महागड्या भेटवस्तू आणि मोठ्या प्रमाणात पैसे दिल्यावरून टीका केली आहे. एका युजरने म्हटलं की, 'हे लग्न नसून डील आहे.'