सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारच्या पटनामध्येही हीच स्थिती बघायला मिळाली. पण काही लोकांना याचं काही पडलेलं नसतं. ते त्यांना वाटतं ते करण्यात मग्न असतात. आता या अदिती सिंग नावाच्या तरूणीलाच बघा ना, तिने फोटोशूट केलं तेही चक्क पटनामध्ये पूर आलेला असताना. यावर काही लोक संतापले तर काही लोक म्हणाले की, पूरामुळे अडचणीत आलेल्या लोकांची ही खिल्ली उडवणारं आहे.
फोटोग्राफर सौरभ अनुराजने या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सौरभने सांगितले की, हे फोटोशूट करण्यामागचा उद्देश हा होता की, पटनातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा लोकांना अंदाज यावा. जेणेकरून या पूरामुळे कुठे अडकलेल्या लोकांना मदत व्हावी. पण काही लोकांना हे चांगलं वाटलं नाही. त्यांना वाटलं की, या परिस्थितीची खिल्ली उडवली जात आहे.
हे फोटोशूट पटनातील बोरिंग रोड, नागेश्वर कॉलनी आणि एसके पुरी परिसरात करण्यात आलं.