Viral Video: बंगळुरूच्या एका वाहतूक पोलिसाने सोशल मीडियावर जनतेची मने जिंकली आहेत. कबुतराचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाचा धोका पत्करला. हे पाहून सर्व यूजर्सही थक्क झाले. धावपळीच्या या जीवनात अशी माणसे क्वचितच पाहायला मिळतात, जी एखाद्या व्यक्तीसाठीच नव्हे तर एखाद्या मुक्या प्राण्या-पक्ष्यासाठी आपला जीव धोक्यात घालतील. यामुळेच या पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे लोक कौतुक करत आहेत. तसेच अशा लोकांमुळेच माणुसकी जिवंत आहे अशीही चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.
सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ २७ सेकंदांचा आहे. त्यामध्ये एक ट्रॅफिक पोलीस कबुतराला वाचवण्यासाठी कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय अनेक फूट उंच लोखंडी होर्डिंगवर चढताना दिसतो. तो अतिशय वेगाने आणि सावधगिरीने कबुतरापर्यंत पोहोचतो आणि पक्ष्याच्या पायात अडकलेला धागा सोडवतो. धागा सुटताच पक्षी मुक्त होतो आणि हवेत उडून जातो. पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडस आणि तळमळीसोबतच त्याच्या माणुसकीचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
असे असले तरी, काही वापरकर्त्यांनी सांगितले की हे पोलीस कर्मचार्यांसाठी खूप धोकादायक असू शकते. थोडीशी चूक झाली असती तर त्याचा जीवही जाऊ शकला असता, असे काहींनी म्हटले. मात्र हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही. बेंगळुरूचे वाहतूक पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त कुलदीप कुमार आर जैन यांनी ट्विटरवर कबुतराची सुटका करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- पोलीस कर्मचाऱ्याचा हा न पाहिलेला पैलू तुमच्या मनालाही समाधान देईल.