हावडा येथील पियाली घोषालने समाजाची पर्वा न करता आपलं चहाचं दुकान 'द अमो चाय'ने नवी ओळख निर्माण केली. तिची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तिच्या दुकानासमोर चहा पिण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. तिने जेव्हा चहा विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा खूप लोकांनी तिला टोमणे मारले. तिच्या निर्णयावर अनेक जण हसत होते. पण तिने हार मानली नाही.
पियाली घोषालने हावडा येथील आसुतोष कॉलेजमधून शिक्षण घेतलं. छोट्या बजेटमध्ये व्यवसाय सुरू केला. तिने आपल्या दुकानाचं नाव 'द अमो चाय' असं ठेवलं आहे. ज्याचा अर्थ "आय लव्ह टी" असा आहे. तिने चहाचे दर खूपच कमी ठेवले, तिच्या दुकानात चहा फक्त ७ रुपयांपासून सुरू होतो. तसेच तिने तिच्या मेनूमध्ये इतर पदार्थ देखील जोडले.
२०१५ मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर पियालीने शाळेत काम करायला सुरुवात केली. ती त्यासोबतच मॉडेलिंग देखील करायची. काही वर्षांनी ही दोन्ही कामं नीट करता येत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने एव्हिएशन मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि एअरलाइन्स कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला.
२०२० मध्ये तिची कतार एअरवेजने निवड केली होती, परंतु लॉकडाऊनमुळे तिचे जॉइन होण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर पियालीला कठीण प्रसंगाला सामोर जावं लागलं, जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झालं. या कठीण काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने चहाचं दुकान सुरू केलं.
पियालीने दिलेल्या माहितीनुसार, ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि समाजाने मुलीने जेव्हा चहाचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते योग्य मानलं नाही. असं असतानाही समाजाची पर्वा न करता आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हावडा येथे चहाचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला.