नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे (Social Media) युग आहे इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी अनेकांचे मनोरंजन करत असतात तर काही गोष्टी विचार करण्यास भाग पाडतात. सध्या एका आज्जीबाईंची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. वयाच्या 100 व्या वर्षी आज्जीबाईंची इच्छा ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या आज्जींनी त्यांच्या 100 व्या वाढदिवशी स्वत:ला अटक करण्याची इच्छा व्यक्त केली होती अखेर ती पूर्ण झाली आहे.
वयाच्या 100 व्या वर्षी आज्जीबाईंना अटक दरम्यान, जीन बिकेंटन (Jean Bickenton) नावाच्या आज्जींनी आपली अनोखी इच्छा व्यक्त करून सर्वांचेच लक्ष वेधले. या आज्जींनी नुकताच आपला 100 वा वाढदिवस साजरा केला असून त्यांची अनोखी इच्छा पूर्ण करण्यासाठी पोलीस देखील उपस्थित होते त्यांनीच त्यांना सन्मानाने अटक केली. खरं तर या आज्जीबाई मोठ्या कालावधीपर्यंत लष्करात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत कधीही अटक झाली नव्हती. हेच अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अटकेची इच्छा व्यक्त केली होती.
व्हिक्टोरिया पोलिसांनी संबंधित आज्जींसोबतचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. हे सर्व आपण का करत आहोत याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी आज्जीबाईंना आरामात हातकडी लावून अटक केली. जीन बिकेंटन या आज्जीबाईंनी सांगितले की, ही त्यांच्या वाढदिवसाच्या सर्वात अनोखी पार्टी आहे. सध्या या आज्जीबाईंच्या अनोख्या वाढदिवसाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.