ब्रह्मपूर – देशात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे मागील ४ महिने लॉकडाऊन करण्यात आलं होतं, त्यानंतर आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत. मात्र लॉकडाऊनबाबत अद्यापही पोलिसांकडून कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं दिसून येते. लॉकडाऊनदरम्यान ओडिशामधील ब्रह्मपूर जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत पोलिसांच्या मनमानी कारभाराचा फटका गरीब फळविक्रेत्याला होताना दिसत आहे. या व्हिडीओ एका विक्रेत्याकडून पोलीस फळ हिसकावून घेताना दिसत आहेत. एका गरीब फळविक्रेता सायकलवरुन प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये केळे विकत होता. त्यावेळी पोलिसांनी या फळविक्रेत्याला अडवलं. सुरुवातीला पोलीस कर्मचारी फळविक्रेत्याची चौकशी करताना दिसले त्यानंतर फळविक्रेत्याची सर्व फळे हिसकावून घेत पोलीस व्हॅनमध्ये ठेवले.
पोलिसांच्या या कृत्यामुळे गरीब फळविक्रेत्याला रडू कोसळलं, हा व्हिडीओ कोणीतरी घराच्या छतावरुन रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर ट्विटर आणि फेसबुकवर व्हिडीओ जोरदार व्हायरल होऊ लागला. माहितीनुसार हा फळविक्रेता कंन्टेन्मेंट झोनमध्ये फळ विक्री करत होता. पोलिसांनी सांगितले की, कंन्टेन्मेंट झोनमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे फळविक्रेत्यावर कारवाई केली. त्याचसोबत पोलिसांनी या फळविक्रेत्याकडून १ हजार रुपयेही वसूल केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सने पोलिसांच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
ट्विटरवर एका युजर्सने लिहिलं आहे की, भारतातील अधिकाऱ्यांचा आणखी एक दुर्देवी व्हिडीओ, ज्यात एका उद्योगपतीपासून ते संपत्ती जप्त करत आहे, कारण त्याने कर्जाची परतफेड केली नाही अशा शब्दात टोमणा मारला आहे. त्यासोबत एका युजरने एसपी बहरामपूर, सीएमओ ओडिशा, जिल्हाधिकारी यांनी टॅग करत म्हटलं आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अनिवार्य आहे हे माहिती आहे, पण हे चुकीचं सुरु आहे. वृद्ध फळविक्रेता दोन वेळच्या जेवणासाठी फळ विकत आहे, तर पोलिसांच्या वर्दीत गुंडागिरी सुरु आहे. बहरामपूर पोलिसांना लाज वाटायला हवी असा संताप त्याने व्यक्त केला.
त्यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहून बहरामपूरच्या एसपींनी यावर उत्तर दिलं की, ही घटना दुर्दैवी आहे. अतिउत्साहामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केले. त्या सर्वांना बोलावून अशाप्रकारे पुढे घटना घडू नये याची खबरदारी घ्या असा इशारा दिला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
नियंत्रण सुटलेला जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येणार, तितक्यात वेगवान बोलेरो कार आली अन्...
एक ‘असा’ बैल तयार, ज्याची पुढील सर्व पिढी नर म्हणून जन्माला येणार; वैज्ञानिकांचा दावा
७० वर्षीय कोरोना रुग्णाचा बेडवरुन पडून मृत्यू; सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड