मध्यरात्रीच्या अंधारात स्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो काय आणि त्यामागचे कारण सांगून नेटकऱ्यांची मने जिंकतो काय. गेल्या आठवड्यात प्रदीप मेहरा या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्याला लष्करात भरती व्हायचे होते, परंतू याचबरोबर आईचा उपचार, घरचा खर्चही चालवायचा होता. म्हणून तो मॅकडोनाल्डमध्ये काम करत होता. काम संपल्यावर लष्करात जाण्याची तय़ारी म्हणून तो जवळपास १० किमी धावतो. आता प्रदीपला मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रि. लेफ्ट. जनरल सतीश दुआ, महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकजण मदतीसाठी पुढे आले होते. आता प्रदीपला कपड्यांच्या रिटेल क्षेत्रातील कंपनी शॉपर्स स्टॉपने मोठी मदत केली आहे. त्याच्या आईच्या उपचारासाठी अडीच लाखांचा चेक दिला आहे. यामुळे प्रदीपला त्याच्या सैन्यात भरती होण्याच्या स्वप्नाकडेही लक्ष देता येणार आहे. चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनीच या तरुणाचे कष्ट जगासमोर आणले होते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, चित्रपट निर्माते विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.