पुणे – काही दिवसांपासून सोशल मीडियात ब्लॅक पँथरचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा ब्लॅक पँथरचा फोटो इतका आकर्षक आहे, त्यामुळे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर लोकांनी याचं कौतुक केले आहे. पण हा फोटो क्लिक करण्यामागे एक संघर्ष कहाणी आहे त्याचा अनुभव खुद्द हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर अभिषेक पगनिसनं सांगितला आहे.
हा सेमी मेलेनिस्टिक बिबट्या आहे, ज्याला ब्लॅक पँथर म्हणून ओळखलं जातं. हा फोटो फोटोग्राफर अभिषेक पगनिस याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. अभिषेक पुण्यातील फोटोग्राफर आहे आणि हा फोटो त्याने चंद्रपूरातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यात कैद केला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अभिषेकशी संपर्क साधून या फोटोबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अभिषेक पगनिसने सांगितले की, हा एक मेलेनिस्टिक बिबट्या आहे, याला ब्लॅक पँथरही म्हणतात. दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर आम्हाला तब्बल २० मिनिटे या ब्लॅक पँथरला पाहता आला, जून महिन्यात संध्याकाळी ५ च्या सुमारास महाराष्ट्रातील ताडोबा रिजर्वमध्ये हा फोटो क्लिक केला आहे. ही माझी पहिलीच वाइल्ड लाइफ ट्रीप होती. जेथे आम्ही वाघांच्या शोधात गेलो होतो. अनेक वाघ पाहिल्यानंतर आम्ही सफारीच्या अखेर दिवशी बिबट्या पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्या शोधात जंगलात निघालो.
यानंतर जंगलात बिबट्याच दर्शन होण्यापूर्वी आजूबाजूच्या प्राण्यांनी आवाज करणे सुरु केले. ज्यात हरिण आणि अन्य प्राणी होते. त्यानंतर एका झाडाच्या मागे पिण्याच्या पाण्याजवळ बिबट्या दिसला. या ब्लॅक पँथरला क्लिक करण्यासाठी आमच्याकडे २० मिनिटे होती. ज्यातील १५ मिनिटे फोटोग्राफीसाठी अत्यंत महत्त्वाची होती. यापूर्वीही एका घटनेत ब्लॅक पँथरच्या फोटोनं सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. हा मेलेनिस्टिक बिबट्या म्हणजे ब्लॅक पँथर कर्नाटकच्या काबीनी जंगलात क्लिक केला होता. मी ज्या ब्लॅक पँथरचा फोटो घेतला तो सेमी मेलेनिस्टिक बिबट्या आहे, जो त्याच्याहून वेगळा आहे असं अभिषेकने सांगितले.