देशात आजही लाखो लोक गरीबीच्या रेषेखाली जगतात. अनेकांना तर एकवेळचेच नाही तर दोन्ही वेळचे पोट भरण्याचे वांदे असतात. या गरीबांना ना रेशन मिळत ना, मदत. सरकारी कागदपत्रे, भाग बदलला की देखील त्यांच्यावर बंधने येतात. कोरोनाकाळात जे काम धंद्यासाठी आले त्यांचे मोठे हाल झाले होते. या लोकांच्या वाट्याचे खाणारे देखील महाभाग असतातच. रेशन घोटाळा, धान्य घोटाळा असे अनेक प्रकार घडत असतात.
सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. रेशन दुकानासमोर एक मर्सिडीज कार येऊन उभी राहते. त्याच्यातून एक व्यक्ती उतरतो आणि ऐटीत रेशनदुकानात जाऊन सरकार गरीबांना फुकट देत असलेली धान्याची पोती गाडीच्या डिकीत टाकतो. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी या व्यक्तीचा व्हिडीओ काढला आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील होशियारपूरचा आहे.
महत्वाचे म्हणजे ही कार मर्सिडीज या हायफाय कंपनीची होतीच, पण तिचा नंबरही व्हीआयपी होता. यासाठी कार मालकाने आरटीओमध्ये लाखो रुपये मोजले असतील. तर या कारमधून बाहेर आलेल्या व्यक्तीने चार गोणी रेशन त्याच्या डिक्कीत टाकले. आता एवढे रेशन तर गरीबातल्या गरीबालाही मिळत नाही, असो. तर त्याने चार गोणी धान्य डिक्कीत टाकले आणि गेला. आता हा व्यक्ती कोण आहे? तो खरेच मर्सिडीजचा मालक आहे का? की तो करोडपतीकडे चालक म्हणून काम करतो याची माहिती समोर आलेली नाही.
आता रेशन दुकान चालकाने तर त्याच्याकडे गरीबांसाठीचे रेशन कार्ड होते असे सांगितले आहे. सरकारी नियमानुसार होल्डर धारक रेशन घेण्यासाठी पात्र असतात. आता ज्यांच्याकडे कार किंवा वाहने आहेत त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. ते फक्त दाखविण्यासाठी हे रेशनकार्ड वापरू शकतात. या व्यक्तीकडे मर्सिडीजची Benz GLA कार होती, जिची सुरुवातीची किंमत 44.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.