Viral Video : भारतातील अनेक भागांमध्ये सध्या थंडीनं कहर केला आहे. अनेक ठिकाणी लोकांचं घराबाहेर निघणंही बंद झालं आहे. तर मनुष्यांप्रमाणे प्राणीही थंडीमुळे हैराण आहेत. सोशल मीडियावर थंडीच्या तडाख्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक मनाला भिडणारा आणि चेहऱ्यावर हसू फुलवणारा एक व्हायरल व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात एक व्यक्ती थंडीमुळे कुडकुडत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना मदत करताना दिसत आहे.
@satyam_suryavanshi123 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओत सत्यम नावाचा तरूण सांगत आहे की, "मित्रांनो, आज खूप जास्त थंडी आहे. आणि माझ्या लेकरांना खूप थंडी वाजत होती. ते थंडीनं कुडकुडत होते. मी त्यांच्यासाठी लगेच शेकोटी पेटवली. बघा अजूनही कसे कुडकुडत आहेत. उब घेण्यासाठी सगळे लाइननं बसले आहेत".
सत्यमनं लोकांना एक आवाहनही केलं. तो म्हणाला की, "मित्रांनो, तुमच्याही आजूबाजूला असे मुके प्राणी असतील. कृपया त्यांची काळजी घ्या. जशी आपल्याला थंडी वाजते, तशीच त्यांनाही वाजते. ते बोलून सांगू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या भावना समजून घ्या".
हा व्हिडीओ पाहून इंटरनेट यूजर्स इमोशनल झाले आहेत. अनेकांना सत्यमनं केलेल्या कामाचं कौतुक केलं. एका यूजरनं लिहिलं की, "तू देवाद्वारे पाठवण्यात आलेला खरा देवदूत आहेस". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "हा लोकांच्या मनाला भिडणारा व्हिडीओ आहे". तिसऱ्यानं लिहिलं की, "आपल्याला तुमच्यासारख्या आणखी लोकांची गरज आहे".