योग्यच म्हटलं गेलं आहे की, तुमची इच्छाशक्ती असेल किंवा मनाची तयारी असेल तर तुम्ही तुमच्या सीमा ओलांडून मोठं काम करु शकता. खासकरुन लोकांची मदत करणाऱ्या लोकांसाठी मदत करायला कुणीही उभं राहतं. यूकेमध्ये एका घटनेत असंच बघायला मिळालं. या घटनेने सर्वांना हैराण तर केलंच सोबतच एक प्रेरणाही दिली. एका रेडिओ जॉकीने स्टुडिओमध्ये बसून एका व्यक्तीचा जीव वाचवला आणि आता या व्यक्तीची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
रेडिओवर कार्यक्रम सुरु असताना आपल्या समय सुचकतेमुळे आणि परिस्थितीचं भान ठेवत या रेडिओ जॉकीने आत्महत्या करायला जात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवला. या रेडिओ होस्टने ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आत्महत्या करायला जात असलेल्या व्यक्तीला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं. क्रिस नावाच्या या व्यक्तीने रेडिओ स्टुडिओमध्ये फोन करुन सांगितले की, त्याने गोळ्यांचा ओवरडोस घेतला आहे आणि आता तो रस्त्यावर आत्महत्या करण्यासाठी जात आहे. क्रिसने रेडिओ होस्ट ली जवळ आपलं मन मोकळं करताना सांगितलं की, तो स्ट्रेस डिसऑर्डरने ग्रस्त आहे आणि आता त्याला जगायचच नाहीये.
पण रेडिओ जॉकी ली ने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन क्रिसला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याचं लोकेशन शोधून काढलं. प्रोग्राम प्रोड्युसरने लोकेशन ट्रेस करुन हेल्पलाइनला फोन करुन सूचना दिली. त्यांना सूचना देण्यात आल्यावर क्रिसला वाचवण्यात यश आलं. आता तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. हे कळाल्यावर रेडिओ जॉकीचे डोळे पाणावले. त्यानंतर ली ने याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. या संवेदनशील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.