बहुतेकदा लोक समोरच्याचा चेहरा पाहूनच त्या माणसांबद्दल मनात मत तयार करतात. मात्र, हे नेहमीच बरोबर असतं असं नाही. एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल एखादं मत तयार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे समोरच्याचा रंग, रूप आणि कपडे पाहून त्या व्यक्तीबद्दलची मत तयार करणं टाळलं पाहिजे. सध्या याचाच प्रत्यय देणारा बंगळुरू येथील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कचरा उचलणाऱ्या या वृद्ध महिलेचं इंग्रजी पाहुन तुम्हीही अवाक् व्हाल.
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला कचरा गोळा करते. मात्र, आता तिचाच जबरदस्त इंग्लिश बोलतानाचा व्हिडिओ (Video of Old Woman Speaking Fluent English) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये (Viral Video) ती सांगते की, जपानमध्ये तिने ७ वर्ष काम केलं आहे. ७ वर्षानंतर ती भारतात परतली. ही महिला सदाशिवनगरच्या जवळ कचरा वेचत होती. या महिलेनं आपलं नाव Cecilia Margaret Lawrence असल्याचं सांगितलं.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, तुमच्या आजूबाजूला नेहमीच काही ना कहीतरी रंजक गोष्टी असतात. तुम्हाला फक्त डोळे उघडे ठेऊन आजूबाजूला पाहण्याची गरज आहे. यातील काही गोष्टी तुम्हाला सुंदर असतील तर काही उदास पण या कहाण्या ऐकुन तुम्हाला वाटेल की आयुष्य हे फुलासारखंच सुंदर आहे. तुमच्यापैकी कोणाला या महिलेला भेटायचं असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
ज्या महिलेनं हा व्हिडिओ बनवला आहे तिनं सांगितलं, की जेव्हा ती या महिलेला भेटली तेव्हा महिला कचरा उचलून प्लास्टिक एकत्र करत होती. व्हिडिओतील वृद्ध महिलेनं सांगितलं, की प्लास्टिक विकून जे पैसे येतात, त्यातून ती स्वतःचा उदरनिर्वाह चालवते. काही लोकांनी या महिलेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.