राजसमंद : राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील दूरदराज गावात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाने आपल्या प्रतिभेने कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना प्रभावित केले आहे. १६ वर्षीय भरत हा माशांच्या जाळ्याचे नेट बनवून गोलंदाजीचा सराव करत आहे. याच व्हिडीओला रिट्विट करत राहुल गांधी यांनी भरतचे कौतुक केले आहे. तसेच या मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आवश्यक मदत करा असे आवाहन देखील राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना केले आहे.
राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ रिट्विट केला आहे, ज्यामध्ये खेड्यातील एक मुलगा गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. राहुल गांधींनी रिट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, १६ वर्षीय भरत सिंग माशांच्या जाळ्याचे नेट बनवून गोलंदाजीचा सराव करत आहे.
राहुल गाधींनी काय म्हटले?"अद्भुत प्रतिभा आपल्या देशातील कानाकोपऱ्यात लपली आहे, ज्याला ओळखणे आणि वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. मी अशोक गहलोत जी यांना आवाहन करतो की, कृपया या मुलांचे स्वप्न साकार होण्यासाठी आवश्यक ती मदत करा." यावर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. "नक्कीच, तो पुढेही जाईल आणि आवश्यक ती मदत देखील केली जाईल."