आपल्या जीवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवणारे जवान, पोलीस यांचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता एका सर्वसामान्य रेल्वे कर्मचाऱ्याचानेही एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला आहे. या रेल्वे कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Railway staff saved man fell on rail track).
पश्चिम बंगालमधील ही घटना आहे. बालीचक रेल्वे स्टेशनवरील एका रेल्वे कर्मचाऱ्याने एका प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. आपल्या जीवाची त्याने बिलकुल पर्वा केली नाही. ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाला पाहताच त्याने मागचापुढचा कोणताही विचार न करता ट्रॅकवर उडी मारली. खरंतर त्याने स्वतःला मृत्यूसमोरच झोकून दिलं. कारण ट्रेन अवघ्या काही अंतरावरच होती. ट्रेनच्या रुपाने मृत्यू समोरून येत होता. तरी त्याने आपल्या जीवाची बाजी लावली.
व्हिडीओत पाहू शकता प्लॅटफॉर्मवर एक रेल्वे कर्मचारी हातात हिरवा झेंडा घेऊन उभा आहे. ट्रेन येताना दिसताच तो प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यावर आला. त्याचवेळी त्याचं लक्ष ट्रॅककडे गेलं. तिथं एक प्रवाशी पडला होता. त्याला पाहताच क्षणाचाही विलंब न करता या कर्मचाऱ्याने त्याच्या दिशेने धाव घेतली आणि ट्रॅकवर उडी मारली. ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाला त्याने उचललं आणि ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला गेला.
दोघंही ट्रॅकवरून बाजूला होताच ते जिथं होतं तिथं दहा सेकंदातच ट्रेन पोहोचली. दोघांचंही नशीब चांगलं म्हणून ते वाचले. अगदी देवदूताप्रमाणे रेल्वे कर्मचारी प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धावून आला. प्रवाशाला त्याने मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं.
@SwarnenduDas1 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव सतीश कुमार आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सतीश यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या हिमतीला दाद देत सर्वांनी त्यांना सॅल्युट केलं आहे.