उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये दसऱ्याच्या दिवशी रामलीला नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राम आणि रावणामध्ये युद्धाचा सीन सुरु होता. राम-लक्ष्मण व रावण एकमेकांवर बाण मारत होते. तेवढ्यात अचानक काहीतरी घडले आणि राम आणि रावण एकमेकांना खरोखरचेच भिडले. लोकांना काही कळायच्या आत या दोन्ही पात्रांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा प्रहार करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
दर्शक रामलीलेच्या कथेत रमले होते. युद्धाचा क्षण सुरु झाला. राम-रावण एकमेकांना चिथावणी देऊ लागले. मोठमोठ्याने आरोळ्या ठोकण्यात येत होत्या. या दोघा कलाकारांमध्ये काहीतरी वाद होता. या वादाची परिणती युद्धाच्या प्रसंगात तणावात झाली आणि दोघेही एकमेकांना भिडले. दर्शकांना सुरुवातीला वाटले की नाटकाचाच भाग आहे. परंतू, दोघे असे भिडले की एकमेकांना धक्काबुक्की करू लागले.
हा युद्धाचा प्रकार पाहून दर्शकांच्या सुरुवातीला काहीच लक्षात आले नाही. परंतू, आयोजकांच्या लगेचच लक्षात आहे. काहीतरी गडबड आहे असे समजताच आयोजकांनी स्टेजवर धाव घेत दोघांनाही बाजुला केले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर रामाच्या अवतारातील कलाकार त्याचा मेकअप व कपडे बदलून तिथून निघून गेला. दुसऱ्या कलाकाराला घेऊन मग रामलीला पूर्ण करण्यात आली.
सलेमपुर गोसाई गावात दुसऱ्या दिवशी पंचायत बोलविण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत कोणीही तक्रार केली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.