समुद्राच्या तळाशी कधी-कधी अशा जीवांशी आपला सामना होतो की, त्यांना बघून आपण स्तब्ध होतो. कारण याआधी कधीही आपण अशाप्रकारचा जीव पाहिलेला नसतो. असंच काहीसं अलास्काच्या समुद्रात झालंय. इथे एका महिलेचा सामना एका वेगळ्याच जीवासोबत झाला. हा जीव दिसायला पिंपळाच्या झाडासारखाच किंवा झाडाच्या मुळांसारखा वाटतो.
साहार वेसेर अल्फोर्ड नावाच्या महिलेने या समुद्री जीवाचा व्हिडीओ तयार केला आणि आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. हा व्हिडीओ पाहता पाहता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय. आतापर्यंत हा व्हिडीओ १४ लाख ८२ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर २३ हजारांपेक्षा अधिक लोकांनी शेअर केलाय.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, हा जीव केशरी रंगाचा आहे आणि त्याचा मधला भाग गोल आहे. तसेच त्याच्या चारही बाजूने झाडाच्या मुळांप्रमाणे त्याच्या नसा पसरलेल्या आहेत. काही लोक तर या जीवाला एलियनही समजत आहेत.
साहारने हा व्हिडीओ अलास्काच्या प्रिन्स ऑफ वेल्स द्वीपावर रेकॉर्ड केला होता. तिचं म्हणणं आहे की, या विचित्र दिसणाऱ्या जीवाचं नाव बास्केट स्टार आहे. साराहने व्हिडीओ काढल्यानंतर हा जीव पुन्हा समुद्रात सोडून दिला.