देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात, अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून एका व्यक्तीने तक्रार केली, त्यानंतर रेल्वेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये IRCTC च्या फूड स्टॉलवर उंदीर दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा फूड स्टॉल मध्य प्रदेशातील आहे. त्याचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर तो अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे.
प्रवाशाने इटारसी जंक्शन रेल्वे स्टेशनवर हा व्हिडीओ काढला आहे. सौरभ नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर याबाबत एक ट्विट केलं आहे. या फुटेजचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सौरभने त्याच्या पोस्टमध्ये IRCTC, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंत्रालयाचं अधिकृत अकाऊंट यांना टॅग केलं आहे.
38 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये IRCTC च्या फूड स्टॉलवर अनेक उंदीर पाहू शकता. येथील खाद्यपदार्थ झाकले गेलेले नाहीत. युजरने व्हिडीओ शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आयआरसीटीसीच्या फूड इन्सपेक्शन ड्यूटीवर उंदीर. यामुळे मी रेल्वे स्थानकावरील विक्रेत्यांचे खाद्यपदार्थ खाणं टाळतो."
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या रेल्वे सेवेच्या अधिकृत अकाऊंटवरून उत्तर देण्यात आलं. हे प्रकरण भोपाळ विभागातील संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आल्याचं रेल्वेने सांगितलं. भोपाळच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
मोठ्या संख्येने लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. पोस्टवर कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. लोक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच व्हिडिओ नाही. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्येही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये उंदीर फिरताना दिसले.