सोशल मीडियावर एक व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसून येतं की, एक ग्राहक त्याच्या ओला स्कूटरचं सर्व्हिस बिल ९० हजार रुपये असल्याने इतका संतप्त झाला की, त्याने शोरूमसमोर हातोड्याने स्कूटर तोडली. एक व्यक्ती त्याच्या एका मित्रासह हातोड्याने नवीन स्कूटर तोडत असताना उभे असलेले लोक व्हिडीओ बनवत आहेत.
ओला ग्राहक शोरूमसमोर हातोड्याने स्कूटर तोडताना दिसत आहे. सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला ९० हजार रुपयांचं बिल दिल्याने ही घटना घडली. फुटेजमध्ये, पांढरा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती शोरूमसमोर ठेवलेल्या स्कूटरला हातोड्याने तोडताना दिसत आहे. नंतर दुसरा माणूस येतो आणि तोही हातोड्याने स्कूटर फोडू लागतो.
हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये शोरूमने ९० हजारांचं बिल केलं, ग्राहक नाराज झाला आणि शोरूमसमोर स्कूटर तोडली असं लिहिलं आहे. कॉमेडियन कुणाल कामरा यानेही ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या खराब ग्राहक सेवेबद्दल जोरदार टीका केली होती.
कामरा यांनी ओला सर्व्हिस सेंटरमध्ये उभ्या असलेल्या स्कूटरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून विक्रीनंतरच्या सेवेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोस्ट करत कामरा यांनी भारतीय ग्राहकांचा आवाज आहे का? ते यास पात्र आहेत का? दुचाकी ही अनेक रोजंदारी मजुरांची लाईफलाईन आहे असं म्हटलं होतं.