भोपाळ: मध्य प्रदेशच्या उज्जैनमधे एक आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. नागदा रेल्वे स्थानक परिसरात एका वृद्ध भिकाऱ्यानं अचानक नोटांचा पाऊस पाडला. फलाटावर भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे असलेले पैसे पाहून तिथून जास्त असलेल्या प्रवाशांना धक्काच बसला. रेल्वे स्थानकात भिकाऱ्याचा कोणासोबत तरी वाद झाला. त्यानंतर ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जीआरपीचं पथक फलाटावर पोहोचलं. त्यावेळी भिकाऱ्याच्या आसपास हजार, पाचशेच्या नोटा पडल्या होत्या. ते दृश्य पाहून जीआरपीच्या पथकाला धक्काच बसला. पोलिसांनी याबद्दल आसपास विचारणा केली. भिकाऱ्यानं त्याच्याकडे असलेले पैसे उडवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
पैसे उडवणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हा भिकारी बुऱ्हाणपूरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली. भिकारी बऱ्याच कालावधीपासून नागदा रेल्वे स्थानकात भीक मागत असून तो श्रीमंत असल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली.
प्रवासी मानसिकरित्या थोडा विक्षिप्त असल्याचं काही प्रवाशांनी सांगितलं. रेल्वे स्थानकात काही जण त्रास देत असल्यानं भिकाऱ्यानं त्याचे कपडे फेकण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या कपड्यातून नोटा पडू लागल्या. त्यात काही कागदपत्रंदेखील होती. एक भिकारी पैशांचा पाऊस पडत असल्याची माहिती रेल्वे स्थानकत तैनात असलेल्या जवानांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फलाटावर पडलेल्या नोटा गोळा करून त्यांनी भिकाऱ्याला दिल्या आणि त्याला बुऱ्हाणपूरला पाठवून दिलं.