- अमेय गोगटे, लोकमत डॉट कॉम १०० दिवस वर्तुळात राहून दाखवा, ५ लाख डॉलर जिंका... शार्क असलेल्या समुद्रात पोहून दाखवाल?; १ लाख डॉलर्स बक्षीस देतो... हा कोट्यवधींचा हिरा चोरून दाखवा, तुमच्याकडेच ठेवा... लपाछुपी खेळा, बक्षिसाची रक्कम आहे, १० लाख डॉलर्स...
चकित झालात ना? महागाई, रिसेशन अशा चर्चा सुरू असताना हे वरचे आकडे वाचून धक्का बसणं स्वाभाविकच आहे; पण या नुसत्याच घोषणा नाहीत बरं. हे प्रत्यक्ष घडलं आहे आणि अनेकांनी ही बक्षिसं जिंकलीही आहेत. खोटं वाटत असेल तर, यू-ट्युबवर जा. लाखो-करोडोंची चॅलेंजेस करणारा, जगातील सगळ्यात श्रीमंत यू-ट्युबर ‘मिस्टर बीस्ट’ तिथे भेटेल आणि त्याचे जगावेगळे कारनामेही पाहता येतील.
जिम्मी डोनाल्डसन. वय २४ वर्षे. दहा वर्षांपूर्वी त्यानं ‘MrBeast6000’ हे यू-ट्यब चॅनल सुरू केलं. गेमिंग व्हिडीओ आणि इतर यू-ट्युबर्सच्या कमाईची इंटरेस्टिंग माहिती देणारे व्हिडीओ तो चॅनलवर पोस्ट करायचा. आज याच ‘मिस्टर बीस्ट’च्या कमाईची नेटिझन्स चर्चा करतात. त्याला कारण ठरला, २०१७ मधला एक व्हिडीओ. कंटाळा आला म्हणून ‘एक ते एक लाख’ आकडे म्हणायचं त्याने ठरवलं, ३५ तासांहून जास्त वेळ एकाच खुर्चीत बसून, काहीही न खाता-पिता त्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मग अनेक ‘रेकॉर्ड’ ‘मिस्टर बीस्ट’च्या नावावर जमा झाले. आज त्याच्या चॅनलचे सबस्क्राईबर आहेत, ११ कोटी ९० लाख आणि व्हिडीओ व्ह्यूज आहेत, १९ अब्ज ९० कोटी ८४ लाख ३३ हजार ४७२.
दर आठवड्याला ‘मिस्टर बीस्ट’चा व्हिडीओ येतोच असं नाही. कधी कधी तो महिन्यातून एकच व्हिडीओ करतो, पण तो एकदमच हटके असतो. ‘स्क्विड गेम’ या वेबसीरिजवरून केलेलं ‘स्क्विड गेम चॅलेंज’ हा चॅनलवरचा सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ आहे. काहींना हा सगळा वेडेपणा वाटू शकतो, पण तरुणाई वेड्यासारखे हे व्हिडीओ पाहते. कोट्यवधींची बक्षिसं वाटणाऱ्या ‘मिस्टर बीस्ट’ची कमाईही कोटींच्या घरात आहे. त्यातील एक वाटा सामाजिक कार्यासाठी देणारा, लोकप्रियतेचा फायदा निधी संकलनासाठी करणारा मिस्टर बीस्ट ‘बडे दिलवाला’च म्हटला पाहिजे.