काही वेळा रेल्वे स्थानकावर अशा घटना घडतात, ज्यामुळे सर्वसामान्यांना धडकीच भरते. पण काही लोक असे असतात जे अशा घटनांमध्ये प्रसंगावधान दाखवतात आणि धैर्याने, तत्परतेने इतरांचा जीव वाचवतात. रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली आहे. एका आरपीएफ जवानाने प्रवाशाचा जीव वाचवून त्याला नवजीवन दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
15743 अप फरक्का एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून निघणार होती. सिग्नल मिळाल्यानंतर ट्रेन सुरू झाली. तेव्हा ट्रेनमध्ये चढताना एक प्रवाशी अडखळला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये अडकला. हे दृश्य पाहून तेथे उभे असलेले लोक घाबरले, मात्र आरपीएफ जवान होरी प्रसाद यांनी घटनास्थळी प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचा जीव वाचवला आहे.
आरपीएफ पोस्ट डीडीयूचे प्रभारी निरीक्षक प्रदीप कुमार रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल होरी प्रसाद यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे. याच दरम्यान ही घटना घडली. एक प्रवासी पडताना दिसताच होरी प्रसाद यांनी आपली चपळाई आणि धैर्य दाखवलं. न डगमगता धावत पडणाऱ्या प्रवाशाला पकडलं.
ट्रेन आपल्या वेगाने जात होती, मात्र जवानाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेनंतर प्रवाशाला सुखरुप ट्रेनमध्ये बसवण्यात आलं. त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं तपासात निष्पन्न झालं. आरपीएफ जवान होरी प्रसाद यांच्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ व्हायरल होत असून सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.