रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे सध्या संपूर्ण जगात तणावाचे वातावरण आहे. ही तिसऱ्या जागतिक महायुद्धाची सुरुवात तर नाही ना? अशी चर्चाही जगभरात होताना दिसत आहे. यातच एका व्यक्तीला पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या तारखेत, दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या तारखेत आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या तारखेत विलक्षण साम्य आढळून आले. या तारखांची संख्या जोडल्यास 68 होते. हा फॉर्म्यूला पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. तर अनेकांनी यावर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.
याव्यक्तीनं जोडला महायुद्धांशी संबंध - पॅट्रिक बेट-डेव्हिड (Patrick Bet-David) यांनी 28 जुलै 1914 ही तारीख बघितली. या तारखेला ऑस्ट्रिया-हंगेरीने पहिल्या महायुद्धाला सुरुवात करत सर्बियाविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. पॅट्रिकने 7, 28, 19, 14 या आकड्यांची बेरीज केली आणि उत्तरात 68 हा आकडा आला. यानंतर त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीची तारीख 1 सप्टेंबर, 1939 घेतली. या तारखेच्या आकड्याचीही बेरीज 68 आली.
पुतिन यांनी या तारखेला केली होती युद्धाची घोषणा - यानंतर पॅट्रिकने ज्या दिवशी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली, ती तारीख म्हणजेच 24 फेब्रुवारी 2022 घेतली आणि हिचीही बेरीज (24+2+20+22 = 68) 68 एवढीच आली. पॅट्रिकने या तारखांतील संबंध शेअर करत ट्विट केले, 'माझ्यासाठी गणितीय सूत्र सर्वकाही आहे. हे अजब आहे.' हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्विटला बातमी लिहेपर्यंत 12,000 हून अधिक लोकांनी लाईक केले होते. तर 3,500 हून अधिक लोकांनी रीट्वीट केले होते.
अशा आल्या युजर्सच्या प्रतिक्रिया -पॅट्रिक यांच्या या फॉर्म्यूल्यावर एका युजरने म्हटले आहे, "हे फारच विचित्र आहे." आणखी एकाने लिहिले, "हे स्वीकार करावेच लागेल, पण हे थोडे विचित्र आहे." अशा अनेक प्रतिक्रिया या संबंधित पोस्टवर आल्या आहेत.