Russian Cup Football Video: फुटबॉल सामन्यात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाला. रविवारी (27 नोव्हेंबर) रशियन चषकाच्या सामन्यादरम्यान घडलेल्या घटनेने फुटबॉल जगताला गालबोट लागले. क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर झेनिट सेंट पीटर्सबर्ग आणि स्पार्टक मॉस्को यांच्यातील सामन्यादरम्यान ही संपूर्ण घटना घडली. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी खेळाचा दर्जा सोडून जोरदार हाणामारी केली. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (९०+ मिनिटे) संपूर्ण वाद सुरू झाला. स्पार्टक मॉस्को फ्री-किक घेत असताना संघाचा फॉरवर्ड क्विन्सी प्रोम्स आणि जेनिट सेंट पीटर्सबर्ग मिडफिल्डर विल्मर बॅरिओस यांच्यात वाद झाला आणि शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर, दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आपसांत भिडले.
झेनिट सेंट पीटर्सबर्गच्या रॉड्रिगो प्राडोने रेफ्रीसमोर स्पार्टकच्या खेळाडूंना लाथ मारताना पकडले. या सोबतच स्पार्टकचा बदली खेळाडू अलेक्झांडर सोबोलेव्हही बॉक्सिंगचा सामना असल्यासारखे राडा केला. याशिवाय उर्वरित खेळाडूंचीही अशीच अवस्था होती. रशियन ब्रॉडकास्टर मॅच टीव्हीच्या या वादाशी संबंधित फुटेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत लाखो लोकांनी ते पाहिले आहे.
एकूण ६ खेळाडूंना लाल कार्ड
सामनाधिकारी व्लादिमीर मोस्कालेव्ह यांनी सुरुवातीला प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु गोष्टी त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्या. दोन्ही संघातील प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश असलेल्या एकूण सहा खेळाडूंना रेफ्रींनी लाल कार्ड दाखवले. यजमान झेनिट सेंट पीटर्सबर्गसाठी माल्कम, बॅरिओस आणि रॉड्रिगो यांना रेड कार्ड देण्यात आले. तर स्पार्टकच्या अलेक्झांडर सोबोलेव्ह, शामर निकोल्सन आणि अलेक्झांडर सेलिखोव्ह यांना रेड कार्ड दाखवण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या खेळाडूंना लाल कार्ड दाखवण्यात आले ते बेंचवर होते आणि घटनेच्या वेळी ते सामन्याचा सक्रिय भाग नव्हते.