नवी दिल्ली : मागील मोठ्या कालावधीपासून युक्रेन आणि रशिया (Ukrain And Russia War) यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगभरातील अनेक देशांना महागाईचा फटका बसत आहे. युद्धामुळे रशियातील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे, यावर उपाय म्हणून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. म्हणजेच १० किंवा त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. या महिलांना Mother Heroin हा अवॉर्ड देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय अशा महिलांना १६,१३८ डॉलर म्हणजेच जवळपास १० लाख रूपये एवढी रक्कम दिली जाणार आहे.
हा सन्मान आणि पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित स्त्री रशियन फेडरेशनची नागरिक असणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे दहावे मूल एक वर्षाचे झाले आहे त्यांनाही हा सन्मान देण्यात येणार आहे. तसेच एखाद्या आईने युद्ध, दहशतवादी हल्ला किंवा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत आपले मूल गमावल्यास ती देखील या पुरस्काराची पात्र असल्याचे सांगितले जात आहे.
'मदर हिरोईन' अवॉर्डचा इतिहास 'मदर हिरोईन' या अवॉर्डची सुरूवात १९४४ मध्ये झाली होती. माजी सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन यांनी हा सन्मान देण्यास सुरूवात केली होती. दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या मृत्यूमुळे याची घोषणा करण्यात आली होती, परंतु १९९१ मध्ये हा पुरस्कार बंद करण्यात आला होता.
विशेष म्हणजे रशियाच्या लोकसंख्येत घट झाली असून सध्या हा आकडा जवळपास १४ कोटींच्या घरात आहे. लोकसंख्या वाढवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकार आता लोकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या फतव्यामागील हेतू जरी वेगळा असला तरी याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.