सोशल मीडियावर नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल व रातोरात कोण स्टार होईल याचा काही नेम नाही. तशी अनेक उदाहरणं देखील आजवर घडली आहे. यातच एक नवं आणि ताजं उदाहरण म्हणजे 'बसपन का प्यार' हे गाणं सध्या सोशल मीडियात तुफान हिट झाला आहे. ''बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...'' हे गाणं काही बॉलिवूड गाणं नसून सुकमा येथील सहदेव नावाच्या चिमुकल्या मुलानं गायलं आहे. सोशल मीडियात हे गाणं व्हायरल झाल्यानंतर सहदेव रातोरात स्टार झालं आहे. यातच आता एमजी मोटर्सच्या शोरुमच्या मालकानं सहदेवच्या गाण्यावर खूश होऊन त्याला २१ हजारांचा धनादेश देऊ केला आहे.
'बसपन का प्यार' गाण्यानं गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला असून या गाण्यावर अनेक व्हिडिओ आणि मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिजनंही या गाण्यावर काही व्हिडिओ आणि रिल्स तयार केले आहेत. रॅपर आणि गायक बादशाह यानंही सहदेवसोबत 'बसपन का प्यार' हे गाणं रिलिज करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचं चित्रीकरण देखील नुकतंच पूर्ण झालं आहे. ११ ऑगस्ट रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे.
गायक बादशाह यानं सहदेवला व्हिडिओ कॉल करुन त्याच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर त्याला चंदीगढला बोलवून घेतलं होतं. बॉलिवूड तर सहदेवच्या गाण्याच्या प्रेमात पडलं आहेच. पण मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील या गाण्याचे चाहते झाले आहेत. नुकतंच मुख्यमंत्री बघेल यांनी सहदेवला बोलावून घेतलं होतं आणि त्याचं गाणं ऐकलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील भूपेश बघेल यांनी शेअर केला होता.
सहदेव एका छोट्याशा गावात राहात असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरात मोबाइल, टीव्ही व इतर कोणत्याच सुखसोयी नाहीत. दुसऱ्याच्या मोबाइलवर गाणं ऐकून त्यानं हे गाणं शाळेत गायलं होतं. आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी फक्त एका क्षणाची गरज असते आणि सहदेवच्या बाबतीतही तेच झालं आहे. सहदेवला मोठं होऊन एक उत्तम गायक व्हायचं आहे असं तो सांगतो.