बिहार: बिहारमधील तरुणांचा सरकारी नोकरीमधील टक्का जास्त आहे. राज्याचा विकास फारसा न झाल्यानं बिहारमधील तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी जीव तोडून मेहनत करतात. संसाधनांची संख्या कमतरता असूनही बिहारचे तरुण स्पर्धात्मक परिक्षांमध्ये बाजी मारताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून बिहारचे हजारो विद्यार्थी सासाराम रेल्वे स्थानकात अभ्यास करायचे. मात्र आता या फलाटावर विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार नाही.
बिहारच्या सासाराम रेल्वे स्थानकात २० वर्षांपूर्वी एक वर्ग सुरू झाला. दररोज रात्री हा वर्ग भरायचा. खुल्या आकाशाखाली भरणाऱ्या वर्गाची बरीच चर्चा झाली. या ठिकाणी सुपर ३० प्रमाणे केवळ ३० विद्यार्थी शिकण्यास यायचे नाहीत. तर ३०० हून अधिक विद्यार्थी अभ्यास करायचे. रेल्वे फलाटावर असलेल्या दिव्यांखाली त्यांचा अभ्यास चालायचा. इथे अभ्यास करून तब्बल १० हजार विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली. विशेष म्हणजे ना इथे कोणी शिक्षक होते, मा कोणती ट्युशन फीज.
सासाराम रेल्वे स्थानकातल्या फलाटानं अनेकांना अभ्यासासाठी एक प्लॅटफॉर्म दिला. इथे अभ्यास करून अनेक विद्यार्थी रेल्वेत स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ, टीटीई, गुड्स गार्ड्स अशा पदांवर रुजू झाले. तर अनेकांनी बँक पीओ, बिहार पोलीस, जीडी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवलं. मात्र आता हा वर्ग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.
रेल्वेचं खासगीकरण होत असल्याची बातमी ऑक्टोबर २०१९ रोजी सासाराम रेल्वे स्थानक परिसरात पसरली. त्यामुळे हजारो विद्यार्थी या भागात जमले. त्यांनी तोडफोड केली. त्यामध्ये रेल्वे फलाटावर बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश होता असा आरोप झाला. तरुणांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत सासाराम एसपींसह रेल्वेचे अनेक अधिकारी जखमी झाले. त्यानंतर फलाटावरील वर्ग बंद करण्याचा निर्णय झाला. यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलांचं मोठं नुकसान होत आहे.