प्रत्येक नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मोठं असतं असं म्हणतात. आजही लोक कृष्ण-सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण देतात. अशी मैत्री आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. सोशल मीडियावर मैत्रीची उदाहरणं देणारे अनेक व्हिडीओज पाहायला मिळत असले, तरी खऱ्या मैत्रीची उदाहरणं असलेले व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक शाळकरी मुलं जेवत आहेत आणि त्यापैकी दोन मुले अशी आहेत, जे खऱ्या मैत्रीचे एक आदर्श उदाहरण घालून देताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, की शाळकरी मुले पंगतीत जेवत आहेत. त्यात एक मित्र दुसऱ्या मित्राला आपल्या हाताने खाऊ घालत आहे. त्याला जेवणाचा घास भरवत आहे. खरंतर तो ज्याला जेवणाचा घास भरवत आहेत तो मुलगा विशेष मुल आहे. मात्र, त्याच्या मित्राचे त्याच्याविषयी असणारे प्रेम पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही.
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे, ‘मैत्री म्हणजे काय? तर हेच ते. अवघ्या ३० सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर १३ हजार लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी छान कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ असे सुंदर संस्कार चांगले पालकच करु शकतात’. तर आणखी एका युजरने लिहिले की, 'हा व्हिडीओ अक्षरश: हृदयाला भिडला, कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणे यालाच खरी मैत्री म्हणतात'.