सद्य काळात माणुसकीचे दर्शन दुर्लभ झालंय. असे फार क्वचित पाहायला मिळते की माणसांमध्ये माणूसकी जिवंत आहे. सद्य युगात माणुस घडाळ्यांच्या काट्यापेक्षाही वेगाने धावतो. मग त्याला माणसुकी किंवा आपलेपणा यासाठी वेळ तो कुठला? पण काही माणसं याला अपवाद ठरतात. त्यांच्यातील माणूसकी समोरच्याला त्याचं दु:ख विसरायला लावते. अशी माणसं त्या व्यक्तीच्या दु:खावर आपल्या माणूसकीने हळूवार मायेची फुंकर घालतात.
सोशल मिडियावर असाच एक काळीज हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. या माणसाने यात जे काही केलंय ते भल्याभल्यांना लाजवणारं आहे. आपण आपल्या विश्वात किती गुंतलेलो असतो आणि समोरच्याच्या दु:खाची आपल्याला जराही पर्वा नसते हे हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येतं.
या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, रोजचा धावपळीचा रस्ता आहे. वाहनांची वर्दळ आहे. प्रत्येकजण घाईत आहे. कुणाला इकडेतिकडे बघायला क्षणाचीही फुरसत नाही. अशातच रस्त्यावरून एक वृद्ध रस्ता ओलांडत येतो. त्याच्या हातात सामान आहे. काठीच्या साह्याने तो हळूहळू चालतोय. तो कसाबसा अर्धा रस्ता ओलांडतो. पण पुढचा रस्ता म्हणजे दिव्य आहे. एकही वाहन आपला वेग कमी करायला तयार नाही की, थांबायला तयार नाही. सर्वजण रस्त्यावरून सुसाट जातायत. त्यातच एक स्कुटीवाला जातोय. पण त्याला तो वृद्ध दिसतो. त्याचं काळीज पिळवटतं. रस्त्याच्या मध्येच तो आपली स्कुटी आडवी लावतो. वाहनं थांबवतो अन् त्या वृद्धाला वाट करून देतो. तो वृद्ध शांतपणे रस्ता ओलांडता आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जातो. यावेळी इतर वाहनही शरमेन तिथल्या तिथे उभी राहतात.
हा व्हिडिओ Buitengebieden यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या कौतुकाचं निमित्त ठरतोय. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. अनेकांनी असं म्हटलंय की हा व्हिडिओ त्यांच्या हृदयाला स्पर्शुन गेला आहे. काहींनी असं म्हटलंय की हा व्हिडिओ पाहुन आमच्या डोळ्यात अश्रु आले. तर एकानं असं म्हटलंय की हा व्हिडिओ पाहुन माझा माणूसकीवरचा विश्वास अधिक दृढ झालाय.