एअसं म्हणतात सुख कधी विकत घेता येऊ शकत नाही. माणसाचं सुखी असणं हे सर्वस्वी त्यावर अवलंबून असते. काहीवेळा नवी कोरी मर्सिडीज घेऊनही माणसं सुखी नसतात पण सेंकड हँड सायकल विकत घेतल्यावर काही माणसांचा आनंद गगनात मावेनासा होतो. हो आम्ही त्याच व्हिडिओबद्दल बोलत आहोत जो व्हिडिओ आयएएस अविनाश शरण यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यावर लगेच व्हायरल झाला. ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला जवळजवळ ७० हजार लाईक्स होते. अनेकांनी हा व्हिडिओ रीट्वीट केला आहे. अनेकांनी त्या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. नेटकऱ्यांना भावुक करणाऱ्या व्हिडिओत नेमके आहे तरी काय? चला जाणून घेऊ...
या व्हिडिओत सेकंड हँड सायकलची पुजा करणारे वडिल आणि मुलगा दिसत आहेत. सायकल तर सेकंड हँड आहे पण त्याची पुजा करताना त्या बाप-मुलाच्या जोडीला दारात मर्सिडीजच उभी असल्याचा आनंद होतो आहे. ते इतक्या उत्साहाने त्या सायकलची पुजा करत आहेत जणू काही फार मोठं सुख त्यांच्या अंगणात उभं आहे. वडिल सायकलला हार घालतात. त्यावेळी मुलगा आनंदाने टाळ्या वाजवत असतो. समोर जणू काही देवच उभा आहे अशी कल्पनाकरत अगदी भक्तीभावाने ते त्या सायकलला नमस्कार करत आहेत.
आता तुम्हाला आम्ही काय बोलत आहोत याचा अंदाज आलाच असेल. हा व्हिडिओ हेच सिद्ध करतो की तुम्ही गरीब असो वा श्रीमंत तुमचा आनंद तुम्ही कशात शोधता यावर तुमचं सुख अवलंबुन आहे. बरेचदा श्रीमंत घरातील लाडावलेल्या लाडोबांना गोष्टींची किंमत नसते हे आपण पाहतो. पण हे लेकरु या सेकंड हँड सायकललाच मनोभावे नमस्कार करत आहे. छोट्याश्या गोष्टीत आनंद शोधत टाळ्या पिटत आहे. या दोघांसाठी या सेकंड हँड सायकलचं मुल्य जगातील सगळ्यात महागड्या गाडीपेक्षाही जास्त असेल. कदाचित ही सायकल त्यांच्या रोजीरोटीलाही हातभार लावणार असेल.