पाणीपुरीवाल्याचा, कुर्ला स्टेशनवरील लिंबू सरबताचा व्हिडीओ साऱ्यांनीच पाहिला असेल. हे बाहेरचे खाणे झाले. परंतू जे दूध सकस आहार म्हणून वापरले जाते, त्या दुधातच कोणी अंघोळ करत असेल तर ते पाहून कसे वाटेल? तुर्कस्तानच्या एका डेअरी प्लांटमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे हा डेअरी प्लान्टच बंद करावा लागला आहे.
या डेअरी प्लँटचा एक कर्मचारी दुधाच्या टबमध्ये बसून 'मिल्क बाथ' घेत होता. या कर्मचाऱ्याच्या या किळसवाणे कृत्य टिकटॉकवर व्हायरल झाले. यानंतर लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आणि अनेकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो कर्मचारी एका दुधाने भरलेल्या बाथटबमध्ये बसला आहे आणि मगाने तो दूध अंगावर ओतत असल्याचे दिसत आहे.
प्रकाराची वाच्यता होऊ लागताच डेअरी प्रशासनाने सारवासारव सुरु केली. त्यांनी सांगितले की ते दूध नव्हते, तर स्वच्छता करण्याचे लिक्वीड आणि पाणी होते. मात्र, त्यावर लोकांचे समाधान न झाल्याने डेअरीने त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे. तसेच त्याचे कंत्राटही रद्द केले आहे.रिपोर्टनुसार ही डेअरी कोन्याच्या सेंट्रल एनाटोलियनमध्ये आहे. या डेअरीमध्येच हा व्हिडीओ बनविण्यात आला होता. दुधाच्या टबमध्ये बसलेल्या या कर्मचाऱ्याचे नाव एमरे सायर आहे. तर हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव युगूर तुरगुट असे आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
यानंतर डेअरीवरही कारवाई करण्यात आली असून ती बंद करण्यात आली आहे. यावर डेअरी प्रशासनाने सांगितले की, हा व्हिडीओ डेअरीला बदनाम करण्यासाठी काढण्यात आला आहे. या व्हिडीओतील जे लिक्विड आहे त्याद्वारे बॉयलर साफ केला जातो.
दुसरीकडे कोन्याचे कृषी संचालक अली एर्गिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या डेअरीला टाळे ठोकण्यात आले आहे. या डेअरीमध्ये आपत्तीजनक गोष्टी पहाय़ला मिळाल्या आहेत, ज्या लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत. यामुळे ही कारवाई करण्यात आली असून दंडही करण्यात आल्याचे ते म्हणाले.