बंगळुरू - इन्फोसेसचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी मोठ्या कष्टातून आपलं साम्राज्य उभारलं आहे. त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. म्हणूनच, आयटी क्षेत्रात इन्फोसेस कंपनीने आज मोठं स्थान निर्माण केलं आहे. हजारो युवकांना मोठ्या पॅकेजेस देत नोकरीच्या संधी नारायणमूर्ती यांनी निर्माण करुन दिल्या आहेत. मिलेनियर्संच्या उद्योजकांच्या यादीत असलेल्या नारायणमूर्तींचा आपल्या लेकीसोबतचा साधेपणा नेटीझन्सला भावला आहे.
नारायणमूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी, तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करावे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, त्यांनी आपल्यावर विधानावर ठाम असल्याचं म्हटलं. त्यानंतर, आता त्यांच्यातील साधेपणा पाहून नेटीझन्सकडून त्यांचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, खुद्द नारायणमूर्ती आणि त्यांची कन्या व इंग्लंडच्या पंतप्रधानांची पत्नी अक्षता मूर्ती एका शॉपमध्ये बसून आईस्क्रीम खाताना दिसून येत आहेत.
ट्विटरवरील Meghna Girish नावाच्या अकाउंटवरून मेघना नारायण मूर्ती आणि अक्षता मूर्ती यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. बंगळुरूतील एका शॉपमधील लेकीसोबतचा बापाचा साधेपणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ''बंगळूरू, जयनगर कॉर्नरहाऊस.. येथे मोठी गर्दी होती. ते शांतपणे आले आणि त्यांनी आईस्क्रीम विकत घेतली. सुदैवाने एका कर्मचाऱ्याने त्यांना ओळखले आणि त्यांना बसायला खूर्च्या दिल्या. आमच्या आवडत्या आईस्क्रीमला युकेच्या पहिल्या महिला आणि तिचे वडील भारताचे आयटी किंग यांच्याकडून विनामूल्य मान्यता मिळाल्याचे पाहून आनंद झाला. कॉर्नरहाऊस नेहमी उत्तम आहे. बंगळूरूला आला तर नक्की खा'', असे मेघना यांनी म्हटलं आहे. मेघना यांच्या ट्विटवरुन या आईस्क्रीम शॉपच्या त्या मालक असल्याचे दिसून येते.
दरम्यान, अक्षता मूर्ती ह्या नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असून इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या त्या पत्नी आहेत. मात्र, आपल्या माहेरी म्हणजेच भारतात त्या सातत्याने येतात. यापूर्वी जी २० परिषदेसाठी त्या पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमवेत नवी दिल्ली येथे आल्या होत्या. त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत करत गप्पा मारल्या होत्या.