सिंगापूरमध्ये एक युवकाचा बाईक चालवताना अपघात झाला. या भीषण अपघातात युवक जखमी होऊन रस्त्यावर पडला आणि बेशुद्ध झाला. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा रस्त्यावर त्याच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. परंतु याच वेळेत युवकाच्या हातात बांधलेलं घड्याळ एक्टिव्ह झालं आणि युवकाचे प्राण वाचले. नेमकं अपघातानंतर काय घडलं हे जाणून घेऊया.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, २४ वर्षीय मोहम्मद फित्री(Muhammad Fitri) त्याच्या बाईकवरुन जात होता. तेव्हा एका व्हॅननं मोहम्मदच्या बाईकला जोरदार टक्कर दिली. त्यानंतर मोहम्मद बाईकवरून खाली रस्त्यावर पडला. या घटनेत जखमी झाल्यानंतर मोहम्मद बेशुद्ध झाला. घटनास्थळी त्यावेळी कुणीच नव्हतं. ज्या व्हॅननं त्याला टक्कर दिली ती फरार झाली. त्यामुळे जखमी मोहम्मदला हॉस्पिटलला घेऊन जाणारं कुणी नव्हतं.
परंतु त्याचवेळी मोहम्मद फित्रीच्या हाताला बांधलेलं Apple Watch एक्टिव्ह झालं त्याने फित्रीच्या हालचाली ट्रॅक केल्या. व्हॅननं टक्कर दिल्यानंतर मोहम्मद रस्त्यावर जखमी अवस्थेत बेशुद्ध पडला असल्याने त्याच्या शरीराची हालचाल बंद झाली होती. ते घड्याळाने ट्रॅक केले. तेव्हा Apple Watch नं अचानक ऑटोमॅटिक प्रोग्रामिंग (Automatic Programming)च्या माध्यमातून इमरजेन्सी सर्व्हिसला कॉल लावला. इतकचं नाही तर फित्रीच्या काही खासगी संपर्क क्रमांकांनाही घड्याळाने अलर्ट पाठवला.
वास्तविक Apple Smartwatch नं युवकाच्या धडकेत पडलेल्या स्थिती रेकॉर्ड केली होती. जेव्हा खूप वेळ युवकाने हालचाल केली नाही तेव्हा त्याने स्वत: इमरजेन्सी सर्व्हिस आणि खासगी संपर्क नंबर डायल केले. याप्रकारे या अपघातानंतर सिंगापूर सिव्हील डिफेंस फोर्स घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी तात्काळ फित्रीला हॉस्पिटलला घेऊन गेले. याठिकाणी त्याच्यावर वेळीच उपचार झाले आणि त्याचे प्राण बचावले. रिपोर्टनुसार, Apple Smartwatch ची चौथी सीरीजमध्ये नवा फिचर मोड देण्यात आला आहे. Apple सोबतच Samsung Galaxy Watch 3 मध्येही इमरजेन्सी कॉलिंगचा फिचर देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. त्याचप्रकारे या तंत्रज्ञानामुळे एका युवकाचा जीव वाचल्याचंही आता सिद्ध झालं आहे.