डर्बन: स्नेक मॅनच्या (Snake Man) नावाने प्रसिद्ध असलेल्या दक्षिण ऑफ्रिकेच्या डर्बन शहरातील अर्नॉल्डने एक खतरनाक धाडस केले आहे. अर्नॉल्डने जगातील सर्वात चपळ असलेला आणि अती विषारी सापांच्या यादीत असलेल्या ब्लॅक मांबाला (World's Fastest Snakes, Black Mamba) पकडले आहे. एवढेच नाही तर या घटनेचा खतरनाक व्हिडीओ त्याने जगासाठी लाईव्ह केला आहे. त्याच्या हातातील साप हा सहा फूट लांबीचा आहे. (Jason Arnold, a Durban-based snake catcher Catches One of World's Fastest Snakes, Black Mamba.)
ब्लॅक मांबा एवढा विषारी आहे की, त्याच्या विषाचे दोन थेंब जरी मानवी शरिरात गेले तर तो व्यक्ती पाणीदेखील मागण्याच्या स्थितीत राहत नाही. लगेचच त्याचा मृत्यू होतो. ब्लॅक मांबा हा जगातील सर्वात चपळ असलेल्या सापांपैकी एक आहे. तो जवळपास ताशी २० किमीच्या वेगाने पळू शकतो. अर्नाल्डचा हा व्हिडीओ डाला यू क्रू ग्रुपने शेअर केला आहे. हा ग्रुप संजीव सिंह यांनी सुरु केला आहे.
फेसबुकवर हा व्हिडीओ चार लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओमध्ये साप घराबाहेरील गार्डनमध्ये लपल्याचे दिसत आहे. ब्लॅक मांबा दिसल्यानंतर तेथील स्थानिकांनी अर्नाल्डला सापाला पकडण्यासाठी बोलावले. ब्लॅकत मांबाला पकडणे खूप कठीण असते. एक फुटाच्या विशिष्ट काठीने अर्नाल्डने सापाला पकडले. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला हा ब्लॅक मांबा तसा भित्रा असतो, मात्र त्याला राग आला की तो असे वार करतो की पाहून भयकंप उडेल. ब्लॅक मांबा हे नाव एकून तो काळा असेल असे वाटले असेल. तसे नाहीय. तो थोडा हिरव्या रंगाचा असतो, फक्त त्याचे तोंड (आतील भाग) काळ्या रंगाचे असते. यामुळेच या सापाचे नाव ब्लॅक मांबा पडले आहे.