वयपरत्वे अंथरुणाला खिळलेले शरीर, तरीदेखील संवादाची भूक, चेहऱ्यावर दांडगा उत्साह आणि त्यांच्याशी संवाद साधणारा मुलगा! आताच्या काळात दुर्मिळ होत चाललेले वडील-मुलाचे नाते एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ते हळवे नाते पाहून नेटकरी भावुक झाले.
दक्षिणेकडील अय्यंगर कुटुंबातले १०५ वर्षांचे आजोबा आणि त्यांचा ७५ वर्षांचा मुलगा या व्हिडिओत आपल्याला दिसतो. वडिलांची गाण्याची आवड ओळखून त्यांचं मन रिझवण्यासाठी मुलगा त्यांच्या आवडीच्या गाण्याची शीळ वाजवतो आणि गाणे ओळखायला सांगतो. शरीर गलितगात्र झाले असले तरी बुद्धी तल्लख असल्याने १०५ वर्षांचे आजोबा ते गाणं अचूक ओळखतात आणि बाप-लेक त्या छोट्याशा क्षणाचा आनंद साजरा करतात. त्याक्षणी दोघांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू अमूल्य आहे.
हल्लीच्या काळात प्रत्येक जण मोबाईल आणि आपल्या कामात व्यग्र असल्यामुळे घराघरातील संवाद हरपत चालला आहे. कुटुंबातील सदस्य निरोपसुद्धा घरच्या व्हाट्स अप ग्रुपवर देतात. तिथेच हसतात, विनोद फॉरवर्ड करतात, चक्क वादही तिथेच घालतात, पण प्रत्यक्ष समोरासमोर बसून एकमेकांचे ऐकून घेत नाहीत, अशी आजची बिकट परिस्थिती आहे. बाकी नाही तर निदान एकत्र जेवण घेण्याइतकाही लोकांकडे वेळ नाही आणि असला तरी त्यांच्या आवडी निवडी परस्पराशी जुळत नाहीत.
श्रावण बाळाचा इतिहास असणाऱ्या आपल्या भारत वर्षामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव हा संस्कार असतानाही सद्यस्थितीत विरोधाभास दिसून येतो. मात्र सदर व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते, की आजही तुरळक का होईना पण असे श्रावण बाळ आपल्या वृद्ध माता पित्यांचा प्रेमाने सांभाळ करत आहेत. या व्हिडीओमध्ये मागे उभ्या असलेल्या आजी आणि हे चित्र पाहून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधानही नोंद घेण्यासारखे आहे.
आजोबांनी ओळखलं ते गाणं कोणतं होतं?
आजोबा दक्षिणेतले असल्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांना 'थेनीलावू' या तमिळ चित्रपटातले ''पट्टाऊ पडावा'' या गाण्याचा मुखडा गुणगुणून दाखवला आणि आजोबांनी क्षणाचाही विलंब न करता तो ओळखून दाखवला.
बाप लेकाचे या वयातही परस्परांशी सूर जुळलेले आहेत, तर त्या घरात आनंदाचे संगीतच उमटणार ना!