माल वाहतूक करण्यासाठी ट्रक, डंपर यांसारखी मोठी वाहने वापरली जातात. वाहनांना केलेली सजावट आणि पाठीवर लादलेले सामान आपले लक्ष वेधून घेतात. त्याबरोबरच आकर्षक असतात त्या म्हणजे वाहनांच्या मागे लिहिलेली मजेशीर स्लोगन आणि ठळक अक्षरात लिहिलेले 'हॉर्न ओके प्लिज!' बाकी सगळे समजू शकतो पण 'हॉर्न ओके प्लिज' मागील संदर्भ काय ते जाणून घेऊया.
यासोबतच या वाहनांच्या मागच्या बाजूला अनेक स्लोगन लिहिलेले असतात, त्यातील एक स्लोगन 'हॉर्न ओके प्लीज' अशा रंगीत शब्दात लिहिलेला असतो. त्याचा सरळ अर्थ असा, की कृपया गाडीचा हॉर्न वाजवा. पण ही सूचना वाटते तेवढी सोपी आणि सरळ नाही. तर त्याचा संबंध दुसऱ्या महायुद्धाच्या काळाशी आहे. कसा ते पाहू...
या स्लोगनचा दुसऱ्या महायुद्धाशी संबंध:
जगात दुसरे महायुद्ध १९३९ मध्ये सुरू झाले आणि १९४५ मध्ये संपले. त्यावेळी भारतात डिझेलचा तुटवडा होता. अशा स्थितीत ट्रकचालक डिझेलमध्ये रॉकेल मिसळून गाडी चालवत असत. केरोसीनच्या वापरामुळे ते लवकर पेटते.
अशा परिस्थितीत, इतर वाहनांपासून अंतर राखण्यासाठी, ट्रक चालकांनी त्यांच्या ट्रकच्या मागे 'हॉर्न ऑन केरोसीन प्लीज' लिहिणे सुरु केले. जेणेकरून इतर वाहन चालक आपोआप सावध होतील. कालांतराने केरोसीन गेले आणि 'हॉर्न ओके प्लीज' राहिले आणि नंतर नंतर तसे लिहिण्याची प्रथाच सुरु झाली.
'हॉर्न ओके प्लीज' चा अर्थ :
ट्रकच्या मागे 'हॉर्न ओके प्लीज' लिहिण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पूर्वीच्या ट्रकमध्ये साइड मिरर नव्हते. अशा स्थितीत ट्रकचालक जास्त उंचीवर बसलेले असल्याने त्यांना पाठीमागून येणाऱ्या वाहनांचे भान राहत नसे. यामुळे हॉर्न वाजवण्याची विनंती, तुम्ही पाठी आहात हे लक्षात आले म्हणून ओके आणि अपघात टाळता यावा म्हणून केलेली विनवणी प्लिज, हे तीन शब्द लिहिण्यास सुरुवात झाली. आणखी एक कारण म्हणजे साबण...
याशिवाय आहे साबणाचे कनेक्शन:
'हॉर्न ओके प्लीज'मागील एक कारण साबणाच्या सिद्धांताशी देखील संबंधित आहे. असे म्हणतात की त्यावेळी टाटा कंपनीने एक साबण लाँच केला होता, ज्याचे नाव होते- ओके! ज्याच्या जाहिरातीसाठी ट्रक निवडले गेले होते. कारण ट्रक लांबचा प्रवास करत होते. त्यासाठी 'हॉर्न प्लिज' शब्दाच्या मध्ये ओके साबणाची जाहिरात केली जाऊ लागली आणि पुढे तो पायंडाच पडला!