यंदा श्रावण कोणी गाजवला असेल, तर ओडिशाची तरुण गायिका अभिलिस्पा पांडा आणि युट्युबर गायक जितू शर्मा यांनी! कुठेही गेलात तरी त्यांनी गायलेली शिवस्तुती हरएकाच्या ओठावर होती आणि मनातही होती. अवघ्या एक महिन्यात या गायकांनी जवळपास १ कोटी लोकांपर्यंत 'हर हर शम्भो' हे गाणं नव्या रूपात पोहोचवले आहे. तरीदेखील त्यांना यशाबरोबरच काही प्रमाणात टीकेलाही सामोरे जावे लागले, पण का? चला जाणून घेऊ!
अभिलिस्पा पांडा ही ओडिशात राहणारी मुलगी घरातूनच गायकी शिकली आहे. अवघ्या १८ वर्षांची अभिलिस्पा 'ओडिशा सुपर सिंगर' या रिऍलिटी शोची विजेती ठरली आहे. तिला भक्तिगीतांची विशेष आवड आहे. तर जितू शर्मा हा गायक आपल्या युट्युब चॅनेलवर नवनवे संगीत प्रयोग सादर करत असतो. श्रावणानिमित्त त्याने शिवस्तुतीचे रेकॉर्डिंग करायचे ठरवले आणि त्यासाठी अभिलिस्पाला विचारणा केली. तिचा होकार आल्यावर त्यांनी शिव स्तोत्राचे रेकॉर्डिंग केले आणि आपल्या युट्युब चॅनलवर ते गाणे प्रकाशित केले.
सुरुवातीला या गाण्याला विशेष प्रतिसाद नव्हता. हळू हळू त्या गाण्याचे शॉट्स व्हायरल होऊ लागल्यावर श्रोत्यांचा प्रतिसाद वाढला. गाण्याची हटके चाल आणि अभिलिस्पाचा भारावून टाकणारा आवाज, तिच्या सादरीकरणाचा अंदाज श्रोत्यांना आवडला आणि पाहता पाहता या गाण्याने कमी कालावधीत भरपूर प्रसिद्धी मिळवली. पण प्रसिद्धी पाठोपाठ टीकाही सुरू झाली.
अच्युत गोपी या विदेशी महिलेने 'भज मन राधे गोविंद'हे भजन गायले होते. ती चाल आवडल्याने जितू शर्मा यांनी त्यांची परवानगी घेऊन त्या चालीवर 'शिव हर शंभो' हे गीत बसवले. मूळ चाल त्याची नसल्याने लोकांनी टीका केली. मात्र जितूने परवानगी घेतल्याचा खुलासा करताच टीकाकारांना चाप बसला आणि व्हिडीओ दुप्पट वेगाने व्हायरल होऊ लागला.
त्यानंतर आणखी एक संकट उद्भवले, ते म्हणजे फर्मानी नाज या गायिकेने केलेल्या दाव्याचे! त्या सुफी गाणी गातात. त्यांनी ही शिवस्तुती गाऊन अभिलिस्पाने आपल्या गाण्याची नकल केल्याचे म्हटले. परंतु जितू शर्मा यांच्याकडे रीतसर पुरावे असल्याने त्याने फर्मानी नाज यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. तेव्हा फर्मानी यांनी आपला दावा मागे घेतला आणि शंभो चा नाद पुन्हा घुमू लागला.
या गाण्याने कमी काळात यश-अपयश आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यात अभिलिस्पाने चुकीच्या ठिकाणी संस्कृत शब्दांची मोडतोड केल्याने काही अभ्यासकांनी नाराजीदेखील व्यक्त केली, परंतु एक गोष्ट चांगली झाली की लहान मुलांच्या तोंडी काचा बादामची जागा शिवस्तुतीने घेतली!