दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जॅकब जूमा यांना अटक केल्यानंतर तिथे हिंसा भडकली आहे. अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उरतले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत ७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती फार वाईट आहे. अशात येथील एक घटना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. इथे एका आईला आग लागलेल्या इमारतीमधून आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तिला खाली फेकावं लागलं.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही चिमुकली २ वर्षांची आहे. डरबनच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ग्राउंड फ्लोरवर काही लोकांनी आग लावली होती. त्यामुळे बरेच लोक वरच्या मजल्यांवर अडकले होते. त्यात एक महिलाही होती आणि तिच्यासोबत एक मुलगीही होती. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मुलीला वाचवण्यासाठी तिने तिला खाली फेकलं.
Naledi Manyoni या मुलीची आई आहे. तिने न्यूज एजन्सी रायटर्सला सांगितलं की, जेव्हा आग लागली तेव्हा ती १६व्या मजल्यावर होती. ती पायऱ्यांनी खाली येत होती. जेव्हा लोकांनी पाहिलं की, माझ्या हातात मुलगी आहे तर लोकांनी ओरडणं सुरू केलं. लोक म्हणाले की, तिला खाली फेक, खाली फेक. सगळीकडे धूर होता. त्यानंतर तिने तिच्या मुलीला खाली फेकलं.
सुदैवाने खाली उभे असलेल्या काही लोकांनी मुलीला धरलं. त्यानंतर या लोकांनी मुलीच्या आईचाही जीव वाचवला. लोक हा व्हिडीओ पाहून भावूक होत आहेत. तसेच भरभरून कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ फारच दु:खद असल्याचं ते म्हणत आहेत.